औरंगाबाद : चिऊताईंना मिळाले हक्काचे घर अन् त्या संसार थाटू लागल्या | पुढारी

औरंगाबाद : चिऊताईंना मिळाले हक्काचे घर अन् त्या संसार थाटू लागल्या

औरंगाबाद : शहरीकरणाच्या जंगलात आता झाडे नष्ट होत आहेत. माणूस आपल्या घरकुलासाठी पशुपक्ष्यांचा निवारा हिरावून घेत आहे. म्हणजेच प्रचंड वृक्षतोड होत आहे. त्यामुळे झाडावर राहणारे अनेक पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. शहरात जंगलाचा किंवा झाडांचा भाग तसा कमीच. त्यामुळे शहरी भागात विविध पक्षी यांना हक्काचे घर ते नाहीच. याला पर्याय म्हणून महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक विद्यालय इंदिरानगर बायजीपुरा या शाळेने चिऊताई घरकुल योजना हा उपक्रम राबवून जणू काही निसर्गाला सहकार्य करणाऱ्या पशुपक्ष्यांचे संवर्धनच केले आहे.

शाळेच्या व्हरांड्यात ७० ते ८० चिमण्यांची घरटे लावण्यात आलेले आहे. या चिमणीच्या घरट्यांची वैशिष्ट्य म्हणजे या घरच्यांमध्ये चिमणीपेक्षा मोठा कोणताही पक्षी किंवा साप आतमध्ये जाऊ शकत नाही. चिमण्यांनी तयार केलेले घर, त्यातील गालिचा व त्यात घातलेले अंडे व त्यातून बाहेर आलेले चिमणीची पिल्ले हे सुरक्षित राहतील. ही घरटे चिमणीला सुरक्षित वाटेल अशा ठिकाणी लावण्यात आलेले आहे. त्यामुळे अनेक चिमण्यांनी आपल्या जोडीदारासह या अनेक घरट्यांमध्ये आपला संसार मांडला आहे. अनेक घरट्यांमध्ये चिमणीच्या बाळाला पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचा पाहण्याचा प्रयत्न चालू असतो. अनेक चिमण्यांनी पिल्लांना चोचित दाणे भरवताना शाळेतील विद्याथी हे दृश्य पाहताना अतिशय आनंदी होतात.

चिमण्या संसार थाटू लागल्या

चिमणीच्या घरट्यांची चिमणीमित्र गुरव यांच्याकडे मागणी केली आणि त्यानुसार ८० ते १०० घरटे त्यांनी पाठवले. ती अशा ठिकाणी बसविण्यात आली की चिमणीला स्वतःच्या कुटुंबासाठी सुरक्षित वाटेल. शाळेच्या परिसरात असलेली विविध झाडे फुलझाडे त्यावर असणारी विविध प्रकारचे लहान लहान फुलपाखरे, किडे हे चिमण्यांचे अन्न शेजारीच असल्यामुळे काहीच दिवसांमध्ये अनेक चिमण्या आपले संसार त्या घरच्यांमध्ये थाटू लागल्या. आज जवळपास ४०० ते ५०० चिमण्या या घरकुलांमधून पाहायला मिळतात.

      – देवेंद्र सोळंके, मुख्याध्यापक

Back to top button