नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोल्हापूर आणि सांगलीला जो वारंवार महापूर येतो, तो रोखण्यासाठी वर्ल्ड बँकेला प्रकल्प देण्यात आला असून, या माध्यमातून पुराचे पाणी पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागासह मराठवाड्यात वळविण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सातपूर येथील डेमोक्रॉसी रिसॉर्टमध्ये आयोजित केलेल्या भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना त्यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. फडणवीस म्हणाले की, कोल्हापूर आणि सांगलीला दरवर्षी महापूरचा सामना करावा लागतो. यावर तोडगा काढण्यासाठी 2019 मध्येच वर्ल्ड बँकेला एक प्रकल्प दिला होता. त्यावेळी वर्ल्ड बँकेने त्यास तत्त्वत: मान्यताही दिली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकल्पाला गती दिली गेली नाही. आता आम्ही पुन्हा एकदा हा प्रकल्प हाती घेतला असून, लवकरच त्याला गती दिली जाईल. आमचा असा दावा आहे की, महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोघांचा हिस्सा सोडल्याच्या व्यतिरिक्त हे पाणी आहे. हे पुराचे पाणी वळण बंधार्याच्या तसेच टनेलच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागासह उजनीच्या माध्यमातून मराठवड्यापर्यंत कसे आणता येईल याबाबतचा आमचा प्रयत्न असेल, असेही फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी नाशिक-नगरच्या पाण्याचा प्रश्न तसेच विदर्भातील पाण्याच्या प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रकल्प हाती घेतल्याची माहिती दिली. याकरिता सर्व प्रकल्पांसाठी एक लाख कोटींचा निधी लागणार असून, तो आम्ही राज्याच्या अर्थसंकल्पाला हात न लावता उभा करू, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या प्रकल्पाला गती दिल्यास कोल्हापूर-सांगलीमध्ये दरवर्षी येणार्या महापुराचा प्रश्न निकाली लागण्याची शक्यता आहे.
विकृतीत वाढ का होतेय, हेच समजत नाही. महापुरुषांनी देशाच्या प्रगतीसाठी विचार मांडले आहेत. त्यांच्या उंचीपर्यंत आपण जाऊ शकत नाही. वक्तव्य करणार्यांची वैचारिक पातळी समजून घ्यावी, देशाच्या विकासासाठी विचार आणि वेळ खर्च केला तर जास्त उचित ठरेल. महापुरुषांनी मोठे योगदान दिले आहे. – उदयनराजे भोसले, खासदार.