

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील अडल्या नडलेल्या लोकांना प्रशासन वेठीस धरत आहे. लोकांचे साधे रेशन कार्ड मधील नाव कमी करण्यासाठी पाचशे ते हजार रुपये मोजावे लागत आहे. त्याचा जाब का विचारीत नाही?, शासकीय कार्यालयात लोकांकडून पैसे उकळण्याच्या 'उद्योगावर' लोकप्रतिनिधी गप्पा का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अँड प्रताप ढाकणे यांनी उपस्थित केला. लोकप्रतिनिधींचा प्रशासनावरती वचक नाही, असा घणाघात करत ढाकणे यांनी नामोल्लेख टाळत आ.मोनिका राजळे यांच्यावर टीकास्त्र सोडले.
पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथे संवाद यात्रेच्या निमित्ताने ढाकणे यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, उद्धव ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख भगवान दराडे, माजी नगरसेवक बंडू पाटील बोरुडे, अनिल ढाकणे, वैभव दहिफळे, सिताराम बोरुडे, दिगंबर गाडे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष भोरू म्हस्के, उध्दव दुसंग, स्वप्निल देशमुख, त्रिंबक देशमुख, महारुद्र कीर्तने, अनिल बंड, अण्णासाहेब मुखेकर, राजु काकडे, भाऊसाहेब फुंदे, बशीर शेख, सिताराम शेळके उपस्थित होते.
ढाकणे म्हणाले, शासकीय कामासाठी जनतेची अक्षरशः पिळवणूक होत असताना तुमचा एक शब्द निघत नाही. प्रशासनासोबत तुमचे लागेबांधे आहेत का? असा सवाल करत प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा दबाव नसल्याचे सांगितले. साडेआठ वर्षात तुम्ही कोणते ठोस कामे केले? असा प्रश्न उपस्थित केला.
..तर मुंडेंविषयी त्यांचं प्रेम वाटलं असतं
पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करायचे म्हणून आमदार करा असा त्यांचा अजेंडा होता. पंकजा मुंडे यांना मी गुरु बहीण मानतो, मग त्या दिवशी गहिनीनाथ गडावर देवेंद्र फडणवीस आले तेव्हा पंकजा मुंडे गडावर आल्या नाहीत. तर मोनिका राजळे गहिनीनाथ गडावर गेल्या नसत्या तरच खरं तुमचं मुंडे कुटुंबाविषयी प्रेम वाटलं असतं, असे ढाकणे म्हणाले.
..त्यावेळी बहिणीचं प्रेम कुठं गेलं?
भागवत कराड केंद्रीय राज्यमंत्री झाल्याबद्दल वाईट वाटायचं काहीच कारण नाही. बीडच्या खासदार डॉ प्रितम मुंडे मंत्री झाल्या पाहिजे होत्या. लोकांची ती भावना होती. त्यांना मंत्री केलं नाही, त्याबद्दल आ. राजळे यांनी साधा निषेधही व्यक्त केला नाही. उलट त्यांचा 'व्हाईटहाऊस' वर आणून सत्कार केला. कुठे गेलं तुमचं बहिणीचं प्रेम? असा सवाल ढाकणे यांनी केला.