आमदार कुणाल पाटील : मोदी सरकारने सामान्य माणसाचा पैसा धोक्यात टाकला

आमदार कुणाल पाटील
आमदार कुणाल पाटील
Published on
Updated on

धुळे : पुढारी वृत्तसेवा

स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एलआयसीमधील गोरगरिबांच्या ठेवीवर डल्ला मारणाऱ्या अदानी समुहाची चौकशी करण्यात यावी. अदानी समुहातील आर्थिक गैरकारभाराचा पर्दाफाश करणार्‍या हिडनबर्ग संस्थेच्या अहवालाची संयुक्त संसदीय समिती किंवा सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधिशाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी. एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडिया व इतर सरकारी वित्तीय संस्थातील गुंतवणुकदारांच्या पैशाला संरक्षण मिळावे. यासाठी सरकारने योग्य ते निर्णय घ्यावेत. अशी मागणी धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्टेट बँक, धुळे व एलआयसी शाखा, धुळे यांच्या कार्यालयासमोर संतप्त निदर्शने करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना देखील मागणीचे निवेदनही देण्यात आले. आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा परिषदेसमोरील स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच एलआयसी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. त्यानंतर एलआयसी कार्यालयासमोर काही काळ रास्ता रोको देखील करण्यात आला. काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. केंद्रातील मोदी सरकारने निवडक उद्योगपतींवर मेहरबानी दाखवत सामान्य माणसाचा कष्टाचा पैसा धोक्यात टाकला आहे. अदानी उद्योग समुहामध्ये एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडिया व सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्थाना कोट्यवधी रुपये गुंतवण्यास मोदी सरकारने भाग पाडले. एलआयसीचे 29 कोटी गुंतवणूकदार व स्टेट बँकेच्या 49 कोटी खातेदारांचा कष्टाचा पैसा परत मिळेल का? अशी भिती निर्माण झाली आहे. एलआयसी व स्टेट बँक ऑफ इंडिया देशाचे गौरव आहेत. या वित्तीय संस्थांमध्ये सर्वसामान्य मध्यमवर्ग, नोकरदार, छोटे व्यापारी यांनी मेहनतीचा पैसा गुंतवला आहे. परंतु मोदी सरकारने अदानींच्या कंपन्यांमध्येे पैसा जबरदस्तीने गुंतवला. अदानी समुहातील गैरकारभारामुळे एलआयसीच्या 39 कोटी पॉलिसीधारक व गुंतवणूकदारांचे 33 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच भारतीय स्टेट बँक व इतर बँकांनी मिळून तब्बल 80 हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. काँग्रेस पक्ष कोणत्याही उद्योगपतींच्या विरोधात नाही. परंतु खास उद्योगपतींसाठी नियम बदलून जनतेचा पैसा धोक्यात घालण्यास विरोध आहे. काँग्रेस पक्ष नेहमीच सामान्य जनतेच्या पाठीशी उभा राहिला आहे.

निवेदन देताना आ. कुणाल पाटील, महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाई नगराळे, माजी खासदार बापू चौरे, माजी आमदार डी. एस. अहीरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, पंचायत समितीचे माजी सभापती भगवान गर्दे, माजी सभापती बाजीराव पाटील, जिल्हा सरचिटणीस डॉक्टर दरबारसिंग गिरासे, बाजार समितीचे माजी उपसभापती रितेश पाटील, ज्येष्ठ नेते साबीर खान, इटंकचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सिसोदे, अनुसूचित जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष किरण नगराळे,महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष गायत्री जयस्वाल, अर्चना पाटील, डॉक्टर दत्ता परदेशी, माजी पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ पाटील, ज्येष्ठ नेते दिलीप नाना शिंदे, पितांबर महाले, मुकुंद कोळवले, सुरेश बैसाणे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी आंदोलनात सहभागी होते.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news