नाशिकमध्ये भाजपतर्फे जितेंद्र आव्हाड यांच्या पुतळ्याला जोडे मोरो | पुढारी

नाशिकमध्ये भाजपतर्फे जितेंद्र आव्हाड यांच्या पुतळ्याला जोडे मोरो

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पुणे येथील जाहीर कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात रविवारी (दि.५) भाजप युवा माेर्चातर्फे आंदोलन करण्यात आले. रविवार कारंजा येथे झालेल्या या आंदोलनावेळी आ. आव्हाड यांच्या पुतळ्याला जोडे मारत त्यांचा निषेध नोंदविण्यात आला.

आ. आव्हाडांनी इतिहासातून मोगलांचा इतिहास काढून टाकणार याचा संदर्भ देत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले. तसेच औरंगजेब, अफजल खान तसेच शाहिस्ते खान आहे, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आहेत ना? असे वादगस्त विधान त्यांनी केले. यापूर्वीदेखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अंगकाठीवरून आव्हाडांनी केलेले चुकीचे वक्तव्य महाराष्ट्र विसरलेला नाही. त्यातच आव्हाडांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. एकीकडे राज्यातील शिवप्रेमींकडून 19 फेब्रुवारीला शिवजयंती सोहळा साजरा करण्याची तयारी सुरू असताना आव्हाडांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य हे शिवप्रेमींना डिवचल्याने भाजप युवा मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी आव्हाडांनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली.

भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अमित घुगे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात योगेश मैंद, भैरवी वाघ, अनिकेत पाटील, विजय बनछोडे, अंकित संचेती, सचिन तांबे, हर्षद जाधव, निखिलेश गांगुर्डे, प्रशांत वाघ, प्रवीण भाटे, पवन उगले, प्रसाद धोपावकर, साक्षी दिंडोरकर, विनोद येवले, हर्षद वाघ यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले.

हेही वाचा : 

Back to top button