माणिकदौंडी घाटात उडदाचा ट्रक उलटला, चालक जखमी | पुढारी

माणिकदौंडी घाटात उडदाचा ट्रक उलटला, चालक जखमी

पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील माणिकदौंडीच्या घाटातील वळणावर दहा चाकी ट्रक उलटून चालक जखमी झाला आहे. ट्रकमधील उडदाचे पोतही दरीत कोसळले. रविवारी मध्यरात्री एक वाजता हा अपघात घडला. (केए 32 डी 9668) ट्रक आष्टी तालुक्यातील कडा येथून उडदाची पोती घेऊन मुंबईकडे जाताना तालुक्यातील माणिकदौंडीच्या धोकादायक वळणावर उलटला, यानंतर ट्रकमधील उडदाची होती. दरीत कोसळल्याने उडीद डाळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

गेल्या आठ दिवसांत याच घाटात अपघात होण्याच्या तीन घटना घडल्या आहेत. यापूर्वीही अनेक अपघाताच्या मालिका या ठिकाणी सुरू असून, यामध्ये अनेकांचे बळी जात आहे. माणिक दौंडीच्या धोकादायक असणार्‍या वळणाची त्वरित दुरुस्ती करून ठिकठिकाणी दिशादर्शक फलके लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत वेळोवेळी लेखीपत्र व्यवहार सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे. तरीसुद्धा या घटनेचे गांभीर्य या विभागाला नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. माणिकदौंडी येथील समीर पठाण, माजी पंचायत समिती सदस्य विष्णूपंत पवार, सुनील ओव्हळ, शिवाजी मोहिते, अमोल शेळके, नय्युम पठाण, सतीश आठरे, राधाकिसन कर्डिले यांनी घाटातील धोकादायक वळणे काढण्याची मागणी केली आहे.

Back to top button