पुणे : चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच ; घरफोडीच्या सात घटना | पुढारी

पुणे : चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच ; घरफोडीच्या सात घटना

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, नारायण पेठ, कोथरूड, मानाजीनगर, धायरी, कोंढव्यातील भाग्योदयनगर, फुरसुंगी, ससाणेनगर अशा सात ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी करत तब्बल आठ लाखांचा ऐवज लांबविल्याचा प्रकार समोर आला आहे. शरणम्मा मल्लीनाथ कवलगी (23, रा. वैष्णवी अपार्टमेंट, नारायण पेठ, मोदी गणपतीजवळ) यांनी घराच्या दरवाजाला कुलूप लावून चावी बाहेरील गादीखाली ठेवली होती. त्या चावीच्या आधारे चोरट्याने कुलूप उघडून घरातील रोख रक्कम, दागिने असा 62 हजारांचा ऐवज लंपास केला. हा प्रकार शनिवारी रात्री बारा ते सव्वाएकच्या सुमारास घडला.

दुसर्‍या घटनेत के. व्हीनम (74, रा. अवंती अपार्टमेंट, अलकापुरी सोसायटी, कोथरूड) याचे राहते घर 1 फेब्रुवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान बंद असताना पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी घरातील रोख रक्कम, परदेशी चलन, पाच तोळ्यांचे दागिने असा 1 लाख 84 हजारांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसर्‍या घटनेत शुभांगी नितीन खटावकर (38, रा. मल्हार हाईट्स, मानाजीनगर, नर्‍हे) यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी 1 लाख 13 हजारांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी त्यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चौथ्या घटनेत सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सम्राट भैरवनाथ बालगुडे (34, रा. शिवराय कॉम्प्लेक्स, आंबामाता रोड, धायरी) यांचे किराणामालाचे दुकान फोडून चोरट्यांनी 90 हजारांची रोकड चोरून नेली. या प्रकरणी त्यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार शनिवारी पहाटे उघडकीस आला. पाचव्या घटनेत कोंढवा खुर्द येथील भाग्योदयनगरमधील मेहबूब अलीसाहब शेख (40) यांचा ताहिरा हिल्समधील फ्लॅट फोडून चोरट्यांनी 1 लाख 5 हजारांचा ऐवज चोरून नेला. शेख यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सहाव्या घटनेत मिक्की किसन परदेशी (37) यांचे फुरसुंगीतील संकेत विहार येथे श्री कृष्ण निवास नावाचे घर आहे. त्याच्या घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी दागिने, रोख रक्कम व चारचाकी गाडी असा 2 लाख 49 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सातव्या गुन्ह्यात रेहाना इजार अन्सारी (वय 50, रा. नवीन म्हाडा कॉलनी, ससाणेनगर) यांची राहत्या घराजवळ पानाची टपरी आहे. चोरट्यांनी त्यांच्या पानाच्या टपरीचा मागून पत्रा उचकटून आतील 15 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस तपास करत आहेत.

Back to top button