नाशिक (मनमाड) : रईस शेख
'गाव करी ते राव काय करी' या म्हणीची प्रचिती मनमाडजवळील वंजारवक्रोशीतील नागरिकांना आली. येथील बेपत्ता गतिमंद मुलाच्या शोधासाठी संपूर्ण गाव एकवटला अन् 10 दिवसांनी सापडलेल्या या मुलाची गावात वाजत गाजत मिरवणूक काढली. या घटनेमुळे ग्रामीण भागात आजही माणुसकी जीवंत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
मनमाडपासून (जिल्हा नाशिक) सुमारे पाच किमी अंतरावरील वंजारवाडीतील अरुण खैरनार उर्फ सम्या (17) हा मुलगा पालकांसह राहतो. सम्या हा काहिसा गतिमंद असल्याचे सांगितले जाते. सकाळपासून रात्रीपर्यंत गावात इकडून तिकडे वावरणारा आणि गावातील प्रत्येकाला मामा म्हणत एक रुपया मागणारा सम्या हा संपूर्ण गावाचा लाडका होता. अत्यंत मनमिळावू स्वभावाचा आणि सर्वांना हवाहवासा वाटणारा सम्या 10 दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झाला होता. रात्री उशिरापर्यंत तो कोणालाच दिसला नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी तसेच अनेकांनी शोध घेऊनही तो सापडत नव्हता. त्यामुळे त्याचे काही बरे-वाईट तर झाले नाही ना? असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांना सतावत होते. अशा परिस्थितीत गाव एकवटला अन् प्रत्येकाने आपापल्या परीने त्याचा शोध सुरू केला. तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोध मोहीम सुरू केली, तर ज्येष्ठांनी सम्याला शोधून आणणाऱ्यास 11 हजारांचे बक्षीस जाहीर केले होते. मात्र, 10 दिवस उलटूनही त्याचा शोध लागत नव्हता. त्यामुळे संपूर्ण गाव अस्वस्थ होता.
अखेर शुक्रवारी (दि. 3) सम्या हा नाशिकरोड रेल्वेस्थानकात फिरत असल्याचे एका व्यक्तीला आढळला. त्याला पाहताच त्या व्यक्तीने जवळ जाऊन सम्याला मिठी मारली. शिवाय सम्या सापडल्याचे ग्रामस्थांना कळवले. ही वार्ता गावात पसरताच सर्वांचा जीव भांड्यात पडला. ज्या व्यक्तीला सम्या सापडला तो त्याला घेऊन गावात आला. इकडे ग्रामस्थांनी जल्लोषाची जय्यत तयारी केली. सम्या गावात येताच त्याचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर गावातील मंदिरात जाऊन त्याने देवाचे दर्शन घेतले. यावेळी 'सापडला रे सापडला… आपला लाडका सम्या सापडला' असेत्याची वाजतगाजत मिरवणूक काढली. यावेळी सम्या भेटल्याचा आनंद केवळ त्याच्या कुटुंबालाच नाही तर संपूर्ण गावाला असल्याचे पाहून दुर्मीळ होत चाललेली माणुसकी आजही ग्रामीण भागात जीवंत असल्याचे दिसून आले. दरम्यान सम्या आल्याची चर्चा सध्या पंचक्रोशीत सुरू आहे.
हेही वाचा :