कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : पुईखडीकडून कोल्हापूरकडे येणाऱ्या मार्गावर कोल्डड्रिंक्सच्या कंटेनरला अपघात झाला. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. रस्त्याकडेला हा कंटेनर पलटी झाला. यामध्ये जखमी झालेल्या चालकाला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हा कोल्डड्रिंक्सचा कंटेनर असल्याने अनेक कंपन्यांची शीतपेयांच्या बॉटल्स या कंटेनरमध्ये होत्या. याची माहिती मिळताच या शीतपेयांच्या बाटल्या पळवण्यासाठी पहाटेपासून लोकांची अक्षरश: झुंबड उडाली.
या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून यामध्ये कोल्डड्रिंक्सचा कंटेनर रस्त्याकडेला पलटी झाल्याचे दिसून येत आहे. तर कोल्डड्रिंक्सच्या बॉटल्स पळवून नेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. आपल्या आवडीच्या कोल्डड्रिंक्सच्या बाटल्या नेण्यासाठी काहींनी तर आपल्या दुचाकीवरून हजेरी लावली आहे. तरूणांसोबतच ज्येष्ठांचीही यासाठी धडपड दिसून येत होती.
काही कोल्डड्रिंक्स प्रेमींनी तर आपल्या दुचाकीवर कोल्डड्रिंक्सचे ट्रे ठेवून तर काहींनी पोती भरून बाटल्या पळवून नेल्या. तर काही पठ्ठ्यांनी आपली ओळख लपवण्यासाठी तोंडाला रूमाल बांधून बॉक्सच्या बॉक्स भरून बाटल्या पळवल्या. लहानांपासून तरूणांपर्यंत इतकेच काय ज्येष्ठ नागरिकांनीही आपल्यालाला उचलता येतील तितक्या उचलून तेथून काढता पय घेतला.
हा प्रकार रस्त्यावर बराच वेळ सुरू होता. यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, घटनेचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.
हेही वाचा :