कुरकुंभ : पुढारी वृत्तसेवा : कुरकुंभ-बारामती रस्त्यावर दुचाकीला हरिण आडवे गेल्याने दौंडमधील दोन सख्या भावाचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यु झाला असून दुसरा जखमी झाला आहे. राहुल बाळासाहेब लोंढे (वय ३७ रा फराटे गल्ली दौंड) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणचे नाव आहे. शुक्रवारी (दि.३) रात्री साडेदहाच्या सुमारास हि घटना घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राहुल लोंढे आणि त्याचा भाऊ दुचाकीवरून बारामतीहून दौंडकडे निघाले होते. कुरकुंभ-बारामती रस्त्यावरील फुड कंपनीजवळ रात्री त्याच्या दुचाकीला हरिण आडवे गेले. यादरम्यान दुचाकीवरून दोघे खाली पडले. राहुल याच्या छातीला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला, तर त्याचा भाऊ जखमी झाला आहे. या घटनेनंतर राहुल याचा मृतदेह रूग्णवाहिकेतून दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. यासाठी जिरेगावचे माजी सरपंच हरिदास लाळगे, कुरकुंभचे माजी उपसरपंच सुनिल पवार, युवराज गरदडे व इतरानी मदतीचे कार्य केले. घटनास्थळी सहायक फौजदार अनिल कोळेकर यांनी भेट देऊन पुढील प्रकिया पार पाडली.