अ. भा. मुस्लीम मराठी साहित्य संमेलन : मुस्लिमांना जाणीवपूर्वक खलनायक ठरवले जाते – हुसेन दलवाई | पुढारी

अ. भा. मुस्लीम मराठी साहित्य संमेलन : मुस्लिमांना जाणीवपूर्वक खलनायक ठरवले जाते - हुसेन दलवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सत्ताधार्‍यांकडून मुस्लिमांना जाणीवपूर्वक खलनायक ठरवले जाते. त्याला उत्तर देण्याचे काम आता मुस्लीम साहित्यिकांनी करायला हवे. पाकिस्तान निर्माण व्हायला मराठी मुस्लिमांचा कधीही पाठिंबा नव्हता. ते मौलाना आझाद यांच्यासोबत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नेते व विचारवंत हुसेन दलवाई यांनी केले.

अखिल भारतीय नवव्या मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाप्रसंगी दलवाई बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष अब्दुल कादर मुकादम, ज्येष्ठ विचारवंत डॉ. अलीम वकील, कवी जावेद पाशा कुरेशी, परिषदेचे अध्यक्ष डॉ. अजीज नदाफ, प्राचार्य डॉ. फारूख शेख, डॉ. सुरय्या जहागीरदार उपस्थित होते. संमेलनाध्यक्ष अब्दुल कादर मुकादम म्हणाले की, मुस्लीम साहित्यिकांची लेखणीची भाषा मराठी आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुस्लीम साहित्यिकांची दखल घ्यावी. झी मराठी वाहिनीवरील होम मिनिस्टरसारख्या कार्यक्रमात मुस्लीम महिलेला स्पर्धक म्हणून आजपर्यंत सहभागी करून घेतले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, सुरुवातीला कलीम अजीज यांनी अब्दुल कादर मुकादम यांची मुलाखत घेतली. त्यानंतर मुस्लीम मराठी साहित्य चळवळीची तीन दशके, आम्ही भारताचे लोक, वर्तमान स्थितीतील मुस्लीम मराठी साहित्यातील सामाजिक व सांस्कृतिक वेध या विषयांवर परिसंवाद झाले. हसीब नदाफ यांनी ठरावांचे वाचन केले. राष्ट्रगीताने संमेलनाचा समारोप झाला.

हेही वाचा:

Back to top button