एकनाथ खडसे यांच्या पत्नीला अंतरिम जामीन मंजूर, सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा | पुढारी

एकनाथ खडसे यांच्या पत्नीला अंतरिम जामीन मंजूर, सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा

जळगाव : भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने दाखल केलेल्या गुह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना सत्र न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर करीत मोठा दिलासा दिला. न्यायाधीश राहुल रोकडे यांनी एक लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात उच्च न्यायालयाने मंदाकिनी खडसे यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण देताना जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात दाद मागण्यास सांगितले होते. त्यानुसार मंदाकिनी यांनी फौजदारी दंड संहितेच्या कलम 88 अन्वये सत्र न्यायालयात अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांच्यावतीने ऍड. मोहन टेकावडे यांनी बाजू मांडली. मंदाकिनी यांनी ईडीच्या तपासादरम्यान संपूर्ण सहकार्य केले आहे. त्यांनी जवळपास 15 वेळा ईडीच्या कार्यालयात हजेरी लावून आवश्यक ती सर्व कागदपत्रे सादर केलेली आहेत, असे ऍड. टेकावडे यांनी सांगितले.

त्यावर ईडीतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी मंदाकिनी खडसे यांच्या जामीन अर्जाला विरोध केला. उभय पक्षांचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी मंदाकिनी यांचा नियमित जामिनाचा अर्ज निकाली काढला जाईपर्यंत त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला. या कालावधीत मंदाकिनी यांनी पुराव्यांमध्ये कुठलीही छेडछाड करू नये, देश सोडून बाहेर जाऊ नये तसेच ईडीचे तपास अधिकारी बोलावतील त्यावेळी यंत्रणेच्या अधिकाऱयांपुढे हजर राहावे, अशा अटी न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर करताना घातल्या आहेत.

हेही वाचा : 

Back to top button