‘गोल्डन बॉय’च्या ममीवर सोन्याचे ताईत | पुढारी

‘गोल्डन बॉय’च्या ममीवर सोन्याचे ताईत

कैरो : प्राचीन इजिप्तमधील ‘गोल्डन बॉय’ म्हणून आता संबोधल्या जाणार्‍या ममीचे संशोधकांनी सीटी स्कॅन केले आहे. त्यामधून या ममीवर आतापर्यंत छुपे असलेले तब्बल 49 ताईत असल्याचे दिसून आले. यापैकी बहुतांश ताईत हे सोन्याचे आहेत.

एका लहान वयाच्या मुलाची ही ममी आहे. या ममीवर सोन्याचे जे दागदागिने आहेत ते पाहून या ममीला ‘गोल्डन बॉय’ असे म्हटले जाऊ लागले. या ममीच्या चेहर्‍यावर सोन्याचा मुखवटाही होता. हा मुलगा मृत्युमुखी पडला त्यावेळी त्याचे वय चौदा ते पंधरा वर्षे असावे असे संशोधकांना वाटते. त्याच्या जबड्यात अक्कलदाढ आलेली नव्हती असे दिसून आले आहे. दक्षिण इजिप्तमध्ये ही ममी सन 1916 मध्ये सापडली होती. कैरोमधील द इजिप्शियन म्युझियममध्ये ही ममी ठेवण्यात आली आहे. ही ममी दोन शवपेट्यांमध्ये ठेवलेली आहे.

वरच्या शवपेटीवर ग्रीक भाषेतील मजकूर कोरलेला असून आतील शवपेटी लाकडी व सुशोभित आहे. या ममीचे सीटी स्कॅनिंग केल्यावर त्यावर अनेक ताईत असल्याचे दिसून आले. हे ताईत 21 प्रकारच्या आकारातील आहेत. हे ताईत मोठ्या कौशल्याने त्याच्या देहावर किंवा देहाच्या आत ठेवलेले आहेत. तसेच त्याच्या तोंडात सोन्याची जीभही आहे. या ममीच्या पायात पादत्राणेही आहेत. ही ममी नेमकी कुणाची आहे हे स्पष्ट झालेले नसले तरी तो तत्कालीन संपन्न कुटुंबातील असावा असे दिसते.

Back to top button