बापरे! पत्नीला त्रास देण्यासाठी केला चेक बाऊन्स, नेमंक प्रकरण काय आहे? | पुढारी

बापरे! पत्नीला त्रास देण्यासाठी केला चेक बाऊन्स, नेमंक प्रकरण काय आहे?

पुणे; पुढारी वृत्तसेवा : विभक्त राहत असलेल्या पत्नीला त्रास देण्यासाठी तिच्या बँकेच्या खात्याच्या धनादेशावर बनावट सह्या करून तो बाऊन्स करून फसवणूक करणार्‍या पतीवर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी त्याला अटकही झाली आहे. आनंद अशोक पालवे (रा. वाघोली) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत स्वाती महिपती दराडे (30, रा. केसनंद, वाघोली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला स्वाती दराडे यांचा मार्केटिंगचा व्यावसाय आहे.

त्यांचा विवाह आनंद पालवे यांच्यासोबत 7 मे 2018 रोजी खोपोली येथे झाला होता. त्यानंतर त्या लोहगाव येथे सासरी नांदण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर काही दिवसांतच त्यांच्यात कौटुंबिक वाद होऊ लागले. त्यातून तो मारहाण, शिवीगाळ करणे, जबरदस्तीने पैसे काढून घेणे असे प्रकार करू लागला. आई-वडिलांना त्रास नको म्हणून हा त्रास सहन करत राहिल्या. जून 2021 मध्ये पतीने त्यांना घरातून हाकलले.

तेव्हापासून त्या विभक्त राहात आहेत. त्यांनी त्यांचे स्त्रीधन परत मिळावे म्हणून न्यायालयात कौटुंबिक हिंसाचाराची केस दाखल केली आहे. त्यांना एक धनादेश बाऊन्स झाल्याचा मेसेज आला. त्यावर त्यांनी चौकशी केली असता हा धनादेश पतीच्या नावाने असल्याचे समजले. परंतु, त्यांनी पतीला कोणताही धनादेश दिला नसताना धनादेशाबद्दल माहिती घेतली असता, सर्व कागदपत्रे पतीच्या घरी सासरीच राहिल्याचे तसेच त्यातील धनादेशावर पतीने बनावट सही केल्याचे निदर्शनास आल्यानंतर स्वाती यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत आनंद पालवे याच्याविरुद्ध फिर्याद दिली.

Back to top button