भाजप प्रदेशाध्यक्षांकडून आमदारांसह कार्यकर्त्यांना निवडणुकीबाबत कानमंत्र | पुढारी

भाजप प्रदेशाध्यक्षांकडून आमदारांसह कार्यकर्त्यांना निवडणुकीबाबत कानमंत्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

विधान परिषदेमध्ये संख्याबळ वाढविण्याकरता केवळ दोन मतांची आवश्यकता आहे. असे झाल्यास अनेक महत्त्वाची विधेयके पारित करता येऊ शकतात. भाजप शिंदे गटाची अनेक विधेयके विधानसभेत सहज मंजूर होतात. मात्र, विधान परिषदेत विरोधकांकडून अडवणूक होत असल्याने तेथील संख्याबळ वाढविण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार पदवीधर व शिक्षक निवडणुकीकडे भाजपने लक्ष केंद्रित केले असून, त्यादृष्टीने अमरावती, नागपूर तसेच मराठवाडा, नाशिक व कोकण जिंकण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील खासदार, आमदार तसेच नगरसेवकांसह कार्यकर्त्यांशी संवाद साधत कानमंत्र दिला.

विधान परिषद निवडणूक अंतिम चरणात आहे. अधिकाधिक मतदान होऊन विजयी होण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून कंबर कसली जात आहे. नागपूर येथे विद्यमान आमदार, तर अमरावतीमध्ये माजी नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांचा विजय निश्चित असल्याचे मानले जात आहे. कोकण, मराठवाडा व नाशिक या तीन विधान परिषदेच्या जागा भाजपकडून पूर्ण ताकद लावली जात आहे. येथील रणनीती कशी असावी, हे सांगण्यासाठी बावनकुळे यांनी रविवारी (दि.२२) लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन केले. विधान परिषदेतील संख्याबळ वाढल्यास आपला सभापती निवडला जाऊ शकतो. आगामी काळात लव्ह जिहादसारखे महत्त्वाचे विधेयकदेखील मंजुरीसाठी येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार कार्यकर्त्यांनी पक्षाकडून निवडणुकीतील उमेदवारांना मदत करण्याचे निर्देश बावनकुळे यांनी दिले.

भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी दीडशे प्लसचा नारा दिला आहे. त्यानुसार दिलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी आतापासूनच तयारी करा आणि सज्जतेचे आदेश त्यांनी दिले. सध्या संख्याबळ अपक्षांसह १२५ इतके आहे. उद्दिष्टपूर्तीजवळ हे संख्याबळ असल्याचे नमूद करत उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये पक्षाची एकहाती सत्ता येऊ शकते, मग महाराष्ट्रात का नाही, असा प्रश्न केला.

नाशिकबाबत लवकरच चित्र स्पष्ट

भाजपसाठी मराठवाडा, कोकणसह नाशिक विधान परिषदेची निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे. या निवडणुकीत भाजपचा उमेदवार नेमका कोण असेल किंबहुना पाठिंबा कुणाला द्यायचा याबाबत येत्या बुधवारी (दि.२५) भाजपकडून चित्र स्पष्ट केले जाणार असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : 

Back to top button