जळगाव दूध संघाची नोकर भरती रद्द | पुढारी

जळगाव दूध संघाची नोकर भरती रद्द

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जळगाव जिल्हा दूध संघात सत्तांतरानंतर नव्या संचालक मंडळाने वादग्रस्त 132 कर्मचाऱ्यांची भरती रद्द करण्याच्या निर्णयाची घोषणा भाजपचे आमदार आणि दूध संघाचे अध्यक्ष मंगेश चव्हाण यांनी केली आहे.

जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघात माजी अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांच्या कार्यकाळात 32 अधिकारी व 132 कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी लेखी परीक्षादेखील दिली होती. मात्र, या भरतीवर दूध संघाच्या माजी कर्मचाऱ्यांनीच हरकत घेतली होती. दूध संघाच्या संचालकांची मुदत संपली असताना ते भरती करू शकत नाही, तसेच आरक्षण लागू असताना विनाआरक्षण भरती प्रक्रिया राबवली जात असल्याचा आराप केला गेला. याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली गेली होती. मंदाकिनी खडसे यांच्या काळात संघाला 9 कोटी 60 लाख रुपये तोटा झाल्याचा दावा करत आ. मंगेश चव्हाण यांनी दूध संघाची आर्थिक स्थिती बिकट असल्याचे कारण देत ही भरती प्रक्रिया संचालक मंडळाने रद्द केल्याचे सांगितले.

राजकीय हेतूने कारवाई – खडसे
राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाख खडसे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना राजकीय हेतूने ही कारवाई केल्याचा आरोप केला आहे. एकीकडे बेरोजगारी, बेकारी वाढत आहे. जे लोक आज नोकरीवर आहेत, त्यांनाच कमी करण्याचा हा प्रयत्न राजकीय हेतूपोटी आहे. या निर्णयामुळे सव्वाशे कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. यातील 90 टक्के कर्मचारी पाच ते सहा वर्षांपासून दूध संघात नोकरी करत आहेत. त्यांना कायम करण्याचा आमचा प्रयत्न होता. दूध संघाविरोधात पाच महिन्यांपासून फक्त आरडाओरड सुरू आहे. तुम्ही काहीतरी ठोस निर्णय घेत तो जनतेसमोर मांडा, असे आवाहन खडसे यांनी केले.

हेही वाचा:

Back to top button