नगर : यंदा उन्हाळ्यातही पाण्याचा सुकाळ ; अपवाद वगळता शेवगाव तालुक्याला नाही बसणार टंचाईची झळ | पुढारी

नगर : यंदा उन्हाळ्यातही पाण्याचा सुकाळ ; अपवाद वगळता शेवगाव तालुक्याला नाही बसणार टंचाईची झळ

रमेश चौधरी  :

शेवगाव : यंदाही उन्हाळ्यात पाण्याचा सुकाळ राहणार असल्याने अपवाद वगळता शेवगाव तालुक्यात इतरत्र पाण्याची टंचाई भासणार नाही. पंचायत समितीने केलेल्या टंचाईग्रस्त अहवालात एक ते दोन टँकरची आवश्यकता भासण्याची शक्यता असून, पाण्यावर सुमारे 13 लाख रूपये खर्च गृहित धरण्यात आला आहे. गत पाच वर्षांपूर्वीची परिस्थिती पाहता तालुक्यात दोन-तीन वर्षे टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची जत्रा भरत असल्याचे चित्र दिसून येत होते. अर्थात त्यावेळी पर्जन्यमानाचे प्रमाणही कमी होते. त्यावेळी पावसाअभावी खरीप व रब्बी पिकांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी येत होत्या.

उन्हाळ्यात लवकरच विहीर, बोअरचे पाणी आटत गेल्याने, ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई होत गेली. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयात धडकत होते. एप्रिल व मे हे दोन महिने अतितीव्र्र टंचाईची भासत होती. वेळप्रसंगी काही गावांत ऑगस्ट अखेरपर्यंत तालुक्यात टँकर चालू असल्याचे पाहावयास मिळाले.

मात्र, गेल्या तीन वर्षांपासून निसर्गचक्रात बदल झाल्याने पावसाळ्यात भरभरून पाणी वाहत आहे. परिणामी जमिनीत पाण्याची पातळी वाढली गेली. अनेक जिरायत क्षेत्र बागायत झाले. गावागावांत बंद असणारे बोअर, विहिरी चालू झाल्या, नदीवरील बंधारे तुडूंब झाले. त्यात जलजीवन योजनेतून अनेक स्वतंत्र पाणीपुरवठा योजना झाल्या. जायकवाडी जलाशय गेली तीन वर्षे ओव्हरफ्लो होत असल्याने, चालू असणार्‍या प्रादेशिक पाणीपुरवठ्याला मुबलक पाणी मिळत राहिल्यामुळे पिण्याच्या पाण्याची अडचण मोठ्या प्रमाणात दूर झाली. त्यामुळे हळूहळू टँकरची संख्या कमी झाली अन् एकेकाळी तालुक्यात लागणार्‍या अनेक टँकरची संख्या चक्क दोन ते तीनवर आली.

यंदा होणारी पाणीटंचाई लक्षात घेता सोनविहीर, नागलवाडी, सेवानगर तांडा, गावठाण, गोळेगाव, सोनेसांगवी अशा सहा ठिकाणी खासगी विहीर अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी 4 लाख 32 हजार रुपये खर्च, नागलवाडी अथवा सोनविहीर येथे टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आल्यास एकच टँकर लागणार आहे. त्यास 6 लाख 88 हजार रुपये व पाणी भरण्यास राक्षी, चापडगाव, शेवगाव उद्भवास 1 लाख 62 हजार असा 12 लाख 82 हजार रुपये खर्चाचा प्रस्ताव आहे.

तीन वर्षे टँकरची संख्या निरंक
तालुक्यातील गेल्या पाच वर्षांतील पाणीटंचाई पाहता सन 2017- 2018, सन 2020-2021, सन 2021-2022 मध्ये टँकर संख्या निरंक राहिली. सन 2015-16 मध्ये टंचाईग्रस्त 52 गावांत 69 टँकरवर 10 कोटी, सन 2016-17 मध्ये 6 गावांत 9 टँकरवर 9 लाख, सन 2018-19 मध्ये 50 गावांत 69 टँकरवर 12 कोटी व 2019-20 मध्ये 3 गावांत 4 टँकरसाठी 7 लाख, असा 22 कोटी 16 लाख रुपये खर्च झाला आहे.

Back to top button