Layoff | ४ महिन्यांत ३ वेळा कामावरुन काढलं, आधी स्नॅप, ॲमेझॉन अन् आता गुगल, पुढे काय करु? IT इंजिनिअरची पोस्ट व्हायरल | पुढारी

Layoff | ४ महिन्यांत ३ वेळा कामावरुन काढलं, आधी स्नॅप, ॲमेझॉन अन् आता गुगल, पुढे काय करु? IT इंजिनिअरची पोस्ट व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर जगभरात नोकरकपातीची (Layoff) लाट सुरु आहे. ॲमेझॉन, ट्विटर, गुगल आणि सेल्सफोर्स आणि इतर सुमारे ९० टेक कंपन्यांनी ५० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. आधी भरघोस पगाराची नोकरी आणि वर्क कल्चर यात आनंद मानणारे तंत्रज्ञ आता भविष्याबद्दल चिंतेत आहेत. मोठ्या प्रमाणात नोकरकपात सुरु असल्याने कंपन्यांत नोकऱ्या मिळणे आता जवळजवळ बंद झाले आहे. एका ठिकाणी काढून टाकल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी ज्यांनी नवीन नोकरी मिळवली तेही आता सुरक्षित नाहीत. कारण नव्या कंपनीतही पुन्हा नोकरी गमवावी लागण्याची भीती निर्माण झाली आहे. गेल्या ४ महिन्यांत एका आयटी प्रोफेशनलला ३ कंपन्यांमधून काढून टाकण्यात आले. तिन्ही ठिकाणच्या नोकरकपातीचा या कर्मचाऱ्याला फटका बसला आहे.

एका निनावी वर्कप्लेस ॲप- ब्लाइंडवर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्या पोस्टमध्ये एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने नोकरकपातीच्या लाटेत त्याची कशी अवस्था झाली आहे याचा अनुभव शेअर केला आहे. त्याने म्हटले आहे की गेल्या दोन महिन्यांत रुजू झाल्यानंतर Google ने त्याला नुकतेच कामावरुन काढून टाकले. पण आयटी क्षेत्रातील अलीकडच्या पाठोपाठ सुरु असलेल्या नोकरकपातीच्या लाटेत त्याला काढून टाकण्याची ही पहिलीच वेळ नाही. गुगलच्या आधी त्याला ॲमेझॉनने (Amazon) नोव्हेंबरमध्ये आणि स्नॅपने (Snap) सप्टेंबरमध्ये कामावरुन काढून टाकले होते.

“आता पुढे काय करावे हे मला माहीत नाही. नोकरी मिळाली तरी ती टिकून राहील याची खात्री नाही. सर्व काही अनिश्चित आहे. पण या टप्प्यावर मला आता लवकरच नोकरी शोधण्याची गरज आहे,” असे त्याने Blind ॲपवरील त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे. याचाच अर्थ असा की गेल्या ४ महिन्यांत त्याला ३ वेळा नोकरी गमवावी लागली. त्याला नोकरी सोडताना वेतनाचा मोबदला मिळाला असला तरी भविष्यासाठी त्याचा पुढचा मार्ग कठीण झाला आहे.

“कोणतीही मोठी टेक कंपनी अजूनही नोकरभरती करत आहे का? मी काही महिन्यांची सुट्टी घेऊन उन्हाळ्यात पुन्हा प्रयत्न करू का? स्टार्टअपकडे जावे का? असे वाटते की, मला अपरिहार्यपणे नवीन कर्मचारी म्हणून काढून टाकले जाईल, म्हणून मला खात्री नाही की नवीन नोकरी शोधणे योग्य आहे की नाही?, अशी भावना त्या कर्मचाऱ्याने पुढे पोस्टमधून व्यक्त केली आहे.

९० टेक कंपन्यांमध्ये नोकरकपात

Amazon ने अलीकडेच सुमारे १८ हजार कर्मचार्‍यांना काढून टाकले, तर Google चे CEO सुंदर पिचाई यांनी कंपनीतून १२ हजार जणांना कमी करण्याची घोषणा केली होती. हे प्रमाण गुगलच्या जगभरातील एकूण कर्मचार्‍यांपैकी सुमारे ६ टक्के आहे. मायक्रोसॉफ्टने नुकतीच नोकरकपातीची घोषणा केली होती. त्यानुसार त्यांनी १० हजार कर्मचार्‍यांना नारळ दिला. एलन मस्क यांच्या नेतृत्वाखाली ट्विटर देखील टप्प्याटप्प्याने त्यांच्या कर्मचार्‍यांची संख्या कमी करत आहे. ट्विटरच्या अनेक कर्मचार्‍यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय कार्यालयांमधील नोकऱ्या गमावल्या आहेत. (Layoff)

हे ही वाचा :

Back to top button