नाशिक जिल्ह्यात ८४ टक्के साठा; धरणे भरली; पिण्याचे पाणी सिंचनाची चिंता सरली | पुढारी

नाशिक जिल्ह्यात ८४ टक्के साठा; धरणे भरली; पिण्याचे पाणी सिंचनाची चिंता सरली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जानेवारीच्या अखेरच्या टप्पामध्ये जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये ८४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पाण्याची उपलब्धता बघता प्रशासनाने विविध धरणांमधून पिण्याचे पाणी व रब्बी हंगामासाठी मागणीनुसार आवर्तन देण्यासाठी नियोजन केले आहे. त्यामुळे जिल्हावासीयांचा पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.

गेल्या वर्षी पावसाने केलेल्या आभाळमायेमुळे जिल्ह्याचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. जानेवारीत शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यातील प्रमुख २४ धरणांमध्ये ५५ हजार ६२ दलघफू साठा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्हावासीयांची जूनपर्यंतची पाण्याची चिंता मिटली आहे. नाशिककरांचा हक्काचा धरण समूह असलेल्या गंगापूरमधील चार प्रकल्प मिळून आठ हजार २७३ दलघफू म्हणजेच ८१ टक्के साठा आहे. तसेच इगतपुरीतील दारणा समूहातील सहा प्रकल्पांमध्ये १६ हजार १२८ दलघफू (८५ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. पालखेड समूहातील तीन प्रकल्प मिळून ६७६५ दलघफू (८१ टक्के) तसेच ओझरखेड समूहातील तिन्ही धरणे मिळून एकूण २८१४ दलघफू म्हणजेच ८८ टक्के साठा आहे. याशिवाय गिरणा खोऱ्यात चणकापूर समूहातील चार प्रकल्प मिळून एकूण साठा १९ हजार २९१ दलघफू (८३ टक्के) आहे. तर पुनदमधील दोन प्रकल्पांत एकत्रितरीत्या १५५३ दलघफू (९५ टक्के) पाणी उपलब्ध आहे. धरणांमधील उपयुक्त साठा विचारात घेता गावांसाठी, पाणीवापर संस्था तसेच रब्बी हंगामासाठी निरनिराळ्या प्रकल्पांमधून आवर्तन देण्यासाठी प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजनावर केले जातेय. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत जिल्हावासीयांना मुबलक पाणी मिळण्यास मदत होणार आहे.

धरणसाठा (दलघफू)
गंगापूर ४७०६, दारणा ५४८९, काश्यपी १७६८, गाैतमी-गोदावरी ११६६, आळंदी ६३३, पालखेड ४६०, करंजवण ४५३०, वाघाड १७७५, ओझरखेड १८८६, पुणेगाव ५४७, तिसगाव ३८१, भावली १३७३, मुकणे ६४२६, वालदेवी १०५५, कडवा १५४२, नांदूरमध्यमेश्वर २४३, भोजापूर ३१०, चणकापूर २३६३, हरणबारी १०२०, केळझर ४९५, नागासाक्या ३२०, गिरणा १५०२१, पुनद १२९६, माणिकपुंज २५७.

हेही वाचा:

Back to top button