सत्यजित तांबे यांना शिक्षक भारतीचा पाठींबा  | पुढारी

सत्यजित तांबे यांना शिक्षक भारतीचा पाठींबा 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे उच्चशिक्षित असून, त्यांच्याकडे संघटन कौशल्य आहे. शिक्षण, दलित, आदिवासी आणि वंचित, पुरोगामी विचारांशी जोडले गेल्याने याच तत्त्वज्ञानाच्या आधारावर त्यांना शिक्षक भारतीचा बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे आमदार कपिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. शिक्षक भारतीच्या पाठिंब्याने तांबे यांना आधार मिळणार आहे.

येत्या ३० जानेवारीला निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिक्षक भारतीने कालिका मंदिरात कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी आमदार पाटील यांनी शिक्षक भारती संघटनेची भूमिका स्पष्ट केली. संवाद मेळाव्यास उपस्थित शिक्षक व पदवीधरांना तांबे यांना पाठिंबा देण्यासंदर्भात विचारणा केली असता सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांनीच हात वर करून समर्थन दिले. तांबे यांना संघटनेचा मोठा अनुभव असून, संघटन कौशल्य हा त्यांचा आवडीचा विषय आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेतदेखील त्यांनी दहा वर्षे सदस्य म्हणून काम पाहिले आहे. डॉ. सुधीर तांबे यांना पंधरा वर्षांपासून मी ओळखतो. डॉ. तांबे यांनी परिषदेमध्ये फक्त पदवीधरांचेच प्रश्न मांडले असे नाही तर शिक्षक, शिक्षण, दलित, आदिवासी व वंचितांचे प्रश्नदेखील त्यांनी मांडले व तेवढ्याच ताकदीने सोडविले आहेत. उमेदवारीवरून तांबे कुटुंबीयांची चुकीची प्रतिमा निर्माण केली जात असल्याचे स्पष्ट करत सत्यजित तांबे यांच्यावर अन्याय झाल्याची बाब लपविली जात असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

सत्यजित तांबे यांना पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पाठिंबा देणाऱ्यांचे शिक्षक भारतीतर्फे स्वागतच करू, असे सांगत भाजपचे नाव घेण्याचे पाटील यांनी टाळले. यावेळी शिक्षक भारतीचे प्रदेशाध्यक्ष अशोक बेलसरे, संघटनेचे पदाधिकारी अर्जुन कोकाटे यांनी मनोगत व्यक्त केले.

शिक्षक भारतीमुळे लढण्याचे बळ

तांबे परिवाराला आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आल्याच्या परिस्थितीमध्ये शिक्षक भारतीने दिलेला पाठिंबा आम्ही कधीच विसरणार नाही, अशी प्रतिक्रिया डाॅ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केली. या नैतिक बळामुळे लढण्याची ताकद आली आहे. जे काय सुरू आहे, याबाबत मी योग्य वेळी बोलणार आहे. शिक्षण क्षेत्रात काम करण्याची मोठी संधी आहे. शिक्षक संस्थाचालक व विद्यार्थ्यांचे प्रश्न निवडून आल्यावर सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

हेही वाचा :

Back to top button