महिला सक्षमीकरण आणि उत्पादक कंपन्या | पुढारी

महिला सक्षमीकरण आणि उत्पादक कंपन्या

महाराष्ट्रात एकूण 1.36 कोटी कोटी शेतकरी असून, त्यापैकी 80 टक्के लहान व सीमांत शेतकरी आहेत. एकूण शेतकर्‍यांमध्ये सुमारे 40 टक्के महिला शेतकरी आहेत; परंतु फक्त 15 टक्के महिलांच्या नावावर शेती आहे. कृषिमूल्य साखळीमध्ये महिलांचा सहभाग हा उत्पादनामध्ये दिसून येतो; परंतु पीक काढणीपश्चात प्रक्रिया व विपणन यामध्ये महिलांचा सहभाग कमी आहे. त्याअनुषंगाने त्याची क्षमता बांधणी करण्यासाठी विविध योजना व प्रकल्पाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत.

भारतीय शेतीचा विचार करताना आता महिला व पुरुष असा वेगवेगळा विचार करणे गरजेचे आहे. महिलांच्या शेतीकाम करण्याच्या पारंपरिक पद्धतीला कौशल्याची जोड मिळत आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतकरी महिलांच्या क्षमतेला मोठे अवकाश मिळाले आहे. मात्र, अजूनही शेतकरी उत्पादक कंपनी उभी करण्यात दुर्दैवाने महिलांचा सहभाग केवळ 2.4 टक्के असल्याचे एका आकडेवारीतून समोर आले आहे.

लहान शेतकरी हा एक महत्त्वपूर्ण घटक म्हणून योजनांची मांडणी करताना महिलांसाठी काही खास बाबींच्या तरतुदी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. सद्यःस्थितीत लहान शेतकर्‍यांच्या कृषी व्यापार संघाच्या माध्यमातून देण्यात येणार्‍या समभागनिधी या योजनेसाठी शेतकरी कंपनीत एक महिला संचालक या अटी व्यतिरिक्त महिलांची फारशी विशेष दखल घेण्याचे प्रयत्न अद्याप अपुरे असल्याची जनभावना आहे.

लहान शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी शासन विविध योजना राबवित असते. आता शेतीक्षेत्रातील बहुतांश मंडळींना शेतकरी उत्पादक कंपनीचे महत्त्व पटलेले आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना व तरतुदी सातत्याने करण्यात येत आहेत. 31 मार्च 2021 पर्यंत देशात 15,948 शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना झाली असून, त्यापैकी महाराष्ट्रात 5216 (33 टक्के) कंपन्यांची नोंदणी झाली आहे.

पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांना वैशिष्ट्यपूर्णरीत्या विकसित करण्याची जोरदार धडपड केल्याचे आशादायक निरीक्षण समोर आले आहे. शेतकरी उत्पादक कंपनीची उभारणी कशी करावी याविषयी तांत्रिक माहिती देणारी प्रसार माध्यमे जोरात आहेत. सोशल मीडिया ते मुद्रण माध्यमांतून शेतकर्‍यांपर्यंत शेतकरी उत्पादक कंपनीची उद्दिष्टे आणि माहिती पोहोचत आहे.

लहान शेतकर्‍यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वस्तरीय प्रयत्नात बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. कृषिमूल्य साखळी विकास आणि कृषी उद्योग निर्मिती करणे, पिकांची उत्पादकता वाढविणे आणि जागतिक बाजारपेठेत शेतकर्‍यांचे प्रमाण वाढविणे अशा प्रगतिशील कृतीपर विचारातून स्मार्ट बांधावरच्या शेतकर्‍यासोबत उभा आहे.

स्मार्ट प्रकल्पामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्याच्या माध्यमातून लहान आणि सीमांत शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी कृषी व्यवसायातील गुंतवणुकीसाठी अर्थसहाय्य, तंत्रज्ञान, निविष्ठा, आणि बाजारपेठेत सुधारित प्रवेश, शेती पिकांचे उत्पादन, कापणी, खरेदी, प्रतवारी, हाताळणी, विपणन तसेच रास्त भाव मिळण्यासाठी बाजारभावाची माहिती या सगळ्या रचनेत शेतकरी उत्पादक कंपन्यांमुळे शेतकर्‍यांचा अधिक सहभाग वाढू शकतो व त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल असे वाटते. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकरी विविध प्रकल्प उभे करू शकतात.

भाडेतत्त्वावर कृषी अवजारे सेवा केंद्र, पॅक हाऊस, अन्न प्रक्रिया युनिट, मसाले युनिट, निंबोळी अर्क युनिट, मूरघास युनिट, बियाणे प्रक्रिया उपकरणे, गोदाम, कांदा चाळ, शेळी पैदास केंद्र, मधुमक्षिका पालन युनिट, व्हेंडिंग कार्ट, शीतवाहन डाळमिल,ऑईल मिल तसेच औषधी वनस्पती प्रक्रिया युनिट असे अनेक प्रकल्प आता लहान शेतकर्‍यांना उभारता येतात. प्रकल्पातून अर्थसहाय्य मिळविण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सभासदांमध्ये किमान 30 टक्के महिलांचा सहभाग असावा, अशी अट घालण्यात आलेली आहे. यामुळे महिलांचा शेतमाल उत्पादन प्रकिया उद्योगातील वाटा वाढण्यास मदत होईल असे वाटते.

कोरोनाच्या महाआपत्तीने मानवाला सहकार्याची नवी व्याख्या शिकवली आहे. कोरोनाशी सामूहिकरीत्या लढत दिल्याने जगाच्या तुलनेत आपला देश लवकर पूर्वपदावर आला. सामूहिकता ही शेतीकामाचे वैशिष्ट्य होते. मध्यंतरीच्या काळात या विशेषाची लुप्तता झाली असे वाटत असतानाच आता पुन्हा सामूहिक शेतीने आपले महत्त्व सिद्ध केले आहे. सामूहिक शेतीतून शेतमालाची थेट विक्री होते व त्यातून शेतकर्‍यांना अपेक्षित नफा मिळत आहे. पुरुष अल्पभूधारक शेतकर्‍यांसोबत महिला शेतकर्‍यांनी आपली कार्यपद्धतीची कूस बदलायची ठरवली आहे.

नागपूर जिल्ह्यातल्या उमरेडमधील काही महिलांनी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली. महिला सामूहिकरीत्या शेतीकामे करू लागल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील तळणी या छोट्या गावाची मोठी गोष्ट जगासमोर आली आहे. कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था, तळणी (ता. मोताळा) या संस्थेच्या प्रेरणेतून मोताळा तालुक्यातील महिला शेतकर्‍यांनी ‘जीवनसंगिनी कृषी विकास महिला शेतकरी उत्पादक कंपनी’ची स्थापना केली.

या महिला शेतकरी कंपनीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून अपार कष्ट व विलक्षण आत्मविश्वासाच्या बळावर कंपनीचे काम पुढे नेले. महिलांनी शेतीचे प्रश्न समजून घेतले. स्थानिक पीकनिहाय पद्धतीचा शास्त्रीय अभ्यास केला. तळणी या गावाजवळील पंधरा गावांपर्यंत ही कंपनी पोहोचली. प्रत्येक गावात 15 ते 20 महिलांचा एक गट स्थापन झाला. एका गावात 3-4 गटांची उभारणी झाली. जवळपास 60 गटांनी कंपनी जोरदार चालविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. महिला शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक मंडळ, तज्ज्ञ आणि व्यवसाय क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींचा सहभाग कंपनीला यशाकडे घेऊन जाणारा ठरला.

महिला एकत्र आल्या तर चमत्कार घडवू शकतात, याची प्रचिती यायला लागली आहे. शेतकर्‍यांना बांधावरच खताचा पुरवठा होऊ लागला. एकत्रित बियाणांची खरेदी झाली. शेतमाल विक्रीसाठी सामूहिकरीत्या बाजारात नेणे, पशुखाद्य व पूरक आहार व्यवसायातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे अशा अनेक उपक्रमांनी कृषी क्षेत्रातील महिलाविश्व प्रकाशझोतात आले.

सोलापूर शहराजवळील बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर येथे यशस्विता अ‍ॅग्रो फार्मर्स कंपनीने आपला वेगळा ठसा उमटविला आहे. 2015 मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीत जवळपास 1400 भागधारक असून, कोट्यवधींची उलाढाल आहे. शेतीमालाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी कंपनीकडून प्रयत्न केला जातो.

डॉ. प्रीती सवाईराम (तंत्र अधिकारी, स्मार्ट प्रकल्प, पुणे)

Back to top button