बिबट्याची भीती अन् कडाक्याची थंडी; आंबेगावात वाड्यांभोवती आता लख्ख प्रकाश | पुढारी

बिबट्याची भीती अन् कडाक्याची थंडी; आंबेगावात वाड्यांभोवती आता लख्ख प्रकाश

पारगाव; पुढारी वृत्तसेवा : ऊसतोडीमुळे बिबट्याची भीती आणि वाढत चाललेली कडाक्याची थंडी, यामुळे धनगर-मेंढपाळांची रोजची रात्र ही वैर्‍याची ठरत आहे. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांना रोखण्यासाठी धनगर-मेंढपाळ रात्रीच्या वेळी आता शेळ्या-मेंढ्यांच्या वाड्याभोवती लख्ख प्रकाश करताना दिसत आहेत. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात धनगर-मेंढपाळांचे सर्वाधिक वाडे आहेत. नोव्हेंबर महिन्यानंतर या परिसरात नगर जिल्ह्यातील ढवळपुरी, पळशी, वनकुटे या परिसरातील धनगर-मेंढपाळ जनावरांच्या चार्‍याच्या शोधात दाखल होतात. संपूर्ण उन्हाळ्याचे दिवस याच परिसरात ते काढतात.

पावसाला सुरुवात झाल्यानंतर ते आपापल्या गावी पुन्हा परत जातात. दररोजच त्यांना उघड्या माळरानावरच पाल ठोकून राहावे लागते. हा परिसर बिबटप्रवण क्षेत्रात येतो. येथे बिबट्यांचा वावर कायम आहे. सध्या ऊसतोडीची कामे वेगात सुरू असल्याने बिबट्यांची भीती देखील वाढली आहे. त्यात कडाक्याची थंडी असल्याने धनगर-मेंढपाळ व त्यांची कुटुंबे अक्षरश: बेजार झाली आहेत.

थंडीमुळे त्यांच्या चिमुकल्यांचे प्रचंड हाल सुरू आहेत. बिबट्यांची भीती आणि कडाक्याच्या थंडीमुळे ही कुटुंबे त्रस्त झाली आहेत. बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी आता धनगर-मेंढपाळांनी उपाय करण्यास सुरुवात केली आहे. रात्रीच्या वेळी शेळ्या-मेंढ्यांच्या वाड्याभोवती ते लख्ख प्रकाश करीत आहेत.

Back to top button