नाशिक : मोबाइल चोरल्याच्या संशयावरून मित्राचा खून, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा | पुढारी

नाशिक : मोबाइल चोरल्याच्या संशयावरून मित्राचा खून, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मोबाइल चोरल्याच्या संशयावरून मित्राचा तलवारीने गळा चिरून खून केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली असून, संशयावरून दोघांची निर्दोष सुटका केली आहे. आरोपीला ५० हजार रुपयांच्या दंडांसह मृत तरुणाच्या वृद्ध आई-वडिलांना नुकसानभरपाई म्हणून एक लाख रुपये देण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.

दिंडोरीत ४ जानेवारी २०१८ रोजी सचिन राजाराम भगर (वय २३) याचा खून झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पोपट बेंडकुळे (वय ३०) याचा मोबाइल फोन चोरीला गेला होता. मित्र सचिनने मोबाइल चोरल्याचा संशय पोपटला होता. मोबाइल सचिनकडे असून, तो देत नाही या रागातून पोपटने त्याचे मित्र संशयित दीपक बेंडकुळे व योगेश बेंडकुळे यांच्या मदतीने सचिनला फिरायला जाण्याच्या बहाण्याने सोबत नेले. सचिनला निर्जनस्थळी नेल्यानंतर पोपटने तलवारीने त्याचा गळा चिरून मृतदेह फेकून दिला होता. खून केल्यानंतर पोपट घरी गेला आणि त्याच्या आई-वडिलांना घटना सांगितली. त्यानंतर तो स्वत: पोलिसांसमोर हजर होत गुन्ह्याची माहिती दिली. या प्रकरणी उपअधीक्षक पाडवी यांनी गुन्ह्याचा तपास करीत, न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे ॲड. सुलभा सांगळे यांनी युक्तिवाद केला. त्यांनी दहा साक्षीदार तपासले. विविध न्यायालयांचे न्यायनिवाडे सादर करीत त्यांनी आरोपीने केलेले कृत्य गंभीर असल्याचे सांगितले.

त्यानुसार अतिरिक्त सत्र न्यायाधीश आदिती कदम यांनी परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे पोपट यास दोषी ठरवून त्यास जन्मठेपेची व आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली आहे. तर संशयावरून दोघांची निर्दोष सुटका केली. आरोपी पोपट बेंडकुळे यास जन्मठेप व ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली असून, मृत सचिन भगर यांच्या आई-वडिलांना नुकसानभरपाई म्हणून एक लाख रुपये देण्याचे आदेश दिले. आई-वडिलांनी रक्कम न स्वीकारल्यास ती विधी विभागात जमा करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले. या खटल्यास दीड महिन्यापूर्वी सुरुवात झाली व जलदगतीने प्रक्रिया झाल्याने आरोपीस शिक्षा झाली.

हेही वाचा :

Back to top button