पुणे : शासकीय रुग्णालयांमध्ये रक्त तपासणीतून जन्मजात व्यंगांचे निदान | पुढारी

पुणे : शासकीय रुग्णालयांमध्ये रक्त तपासणीतून जन्मजात व्यंगांचे निदान

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जन्मजात व्यंगांचे वेळीच निदान झाल्यास उपचार करून बालकांचे जीवन सुसह्य करता येते. यासाठीच जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयांमधील प्रसूती केंद्रांमध्ये नवजात बालकांची रक्त  तपासणी करून व्यंगांचे निदान केले जात आहे. दोन वर्षांमध्ये 12 हजार नवजात बालकांची तपासणी केली आहे. यापैकी 32 बालकांमध्ये जन्मजात व्यंग आढळले आहे.
बर्‍याचदा नवजात बालकांमध्ये गुणसूत्रांमधील असामान्यता, चयापचय क्रियेमधील दोष, थॅलसेमिया, सिकल सेल अ‍ॅनिमिया, हायपरथायरोडिझम, हायपरप्लॅसिया यांसह रक्ताशी निगडित आजार, मज्जासंस्थेसंबंधी दोष आढळून येतात. जन्मजात व्यंगांचे लवकरात लवकर निदान व्हावे, यासाठी हिंद लॅबकडे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविले जातात.

जन्माला आल्यापासून 24 ते 48 तासांच्या आत बालकांची रक्त तपासणी केली जाते. रक्त तपासणीचा अहवाल आल्यावर तीन ते सहा महिन्यांच्या आत पुन्हा बाळाचे आणि पालकांच्या रक्ताचे नमुने घेतले जातात. त्यातून एखाद्या व्यंगाचे निदान झाल्यास उपचारांसाठी फॉलोअप घेतला जातो, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातील डीईआयसी कार्यक्रमाच्या व्यवस्थापिका डॉ. मीनाक्षी हाबळे यांनी दिली.
जन्मजात व्यंगांच्या तपासणीसाठी खासगी रुग्णालयांमध्ये खूप खर्च होतो. शासनातर्फे तपासणीसाठी योजना राबवली जात असून, पालकांनी बाळांच्या सुसह्य भविष्यासाठी तपासणीस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा रुग्णालयाकडून करण्यात आले आहे. वेळेआधी प्रसूती, कमी वजन, जन्माला आल्यानंतर बाळ न रडणे, अशा समस्या दिसल्यासही तपासणी केली जाते. अहवाल प्राप्त झाल्यावर आशासेविकांमार्फत पालकांशी संपर्क साधून उपचारांसाठी पाठपुरावा केला जातो.

 

जन्मजात व्यंगांचे निदान न झाल्यास भविष्यात उंची न वाढणे, मानसिक आणि शारीरिक विकास न होणे, गतिमंदता येणे, अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नवजात बालकांची वेळेत तपासणी होऊन उपचार मिळावेत, यासाठी राज्य कुटुंबकल्याण कार्यालयाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
  – डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक, औंध जिल्हा रुग्णालय

Back to top button