पुणे : पुरोगामी राज्यात महिलेला असुरक्षित वाटणे, ही गंभीर बाब ; रूपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया | पुढारी

पुणे : पुरोगामी राज्यात महिलेला असुरक्षित वाटणे, ही गंभीर बाब ; रूपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  मारहाणीच्या धमक्या येत असल्याने आपल्याला सुरक्षा पुरवावी, अशी मागणी अभिनेत्री उर्फी जावेदने राज्य महिला आयोगाकडे केली आहे. अर्जाबाबत तत्काळ कार्यवाही करून अहवाल सादर करावा, असे पत्र आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना पाठवले आहे. पुरोगामी महाराष्ट्रात महिलेला असुरक्षित वाटणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

वेशभूषेवरून उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यात निर्माण झालेल्या वाक्युद्धाला दररोज नवे वळण मिळत आहे. आता उर्फीने याबाबत राज्य महिला आयोगाचे दरवाजे ठोठावले आहेत. मी सिनेक्षेत्राशी संबंधित असून, राहणीमान आणि दिसणे व्यावसायिकदृष्ट्या आवश्यक आहे, असे उर्फी जावेदने आयोगाला दिलेल्या अर्जात म्हटले आहे. राज्यघटनेने प्रत्येक भारतीयाला स्वच्छंद आणि मुक्त संचाराचा हक्क दिलेला आहे, त्यामुळे उर्फी जावेद यांच्या अर्जाबाबत तत्काळ कार्यवाही करावी व महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे अहवाल सादर करावा, अशा सूचना रूपाली चाकणकर यांनी मुंबई पोलिसांना दिल्या आहेत.

Back to top button