नाशिक पदवीधर'चा हाय होल्टेज ड्रामा, भाजपचा सस्पेन्स कायम : शुभांगी पाटील यांना 'मविआ'चा पाठिंबा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पदवीधरच्या निवडणुकीत सोमवारी (दि.१६) हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. क्षणाक्षणाला बदलणाऱ्या राजकीय घडामोडींमध्ये धुळ्याच्या शुभांगी पाटील यांनी त्यांची उमेदवारी कायम ठेवली असून, ‘मविआ’नेही त्यांना पाठिंबा घोषित केला आहे. तर दुसरीकडे पाटील यांच्या माघारीसाठी प्रयत्न करणाऱ्या भाजपने अद्यापही त्यांच्या पाठिंब्याबद्दलचा सस्पेन्स कायम ठेवल्याने अपक्ष सत्यजित तांबे यांची डोकेदुखी वाढली आहे. एकूणच चित्र बघता पदवीधरचा हा सामना चुरशीचा होणार आहे.
निवडणूक घोषित झाल्यापासून चर्चेत असलेल्या नाशिक पदवीधरच्या रणसंग्राममध्ये अनेक टि्वस्ट पाहायला मिळाले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरीस कॉंग्रेसचे उमेदवार आमदार सुधीर तांबे यांनी पुत्र सत्यजित तांबे यांच्यासाठी थेट निवडणुकीमधून माघार घेतली. परंतु, तांबे पिता-पुत्राच्या राजकीय खेळीमुळे निवडणुकीत अधिक चुरस निर्माण झाली आहे. सोमवारी (दि.१६) अर्ज माघारीच्या दिवशी त्याचे पडसाद उमटले. ‘पदवीधर’च्या आखाड्यातून ६ जणांनी माघार घेतल्याने अंतिमत: १६ उमेदवार रिंगणात आहेत. खरी लढत अपक्ष सत्यजित तांबे विरुद्ध पाटील यांच्यामध्येच होणार आहे.
भाजपने उमेदवारी नाकारल्याने नाराज असलेल्या तसेच यापूर्वीच ठाकरे गटाने पाठिंबा दिलेल्या धुळ्याच्या शुभांगी पाटील यांनी शेवटपर्यंत अर्ज माघारी घेतला नाही. त्यामुळे भाजपची नाचक्की झाली आहे. वास्तविक पाटील यांच्या उमेदवारी माघारीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत भाजपने प्रयत्न केले. त्यासाठी पक्षाचे संकटमोचक ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन हे २ दिवसांपासून नाशिकमध्ये तळ ठोकून होते. परंतु, माघारीची मुदत संपुष्टात येईपर्यंत पाटील नॉटरिचेबल राहिल्याने भाजपच्या प्रयत्नांना सुरूंग लागला. त्यातच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाटील यांना ‘मविआ’चा पाठिंबा घोषित केल्याने त्यांची दावेदारी वरचढ ठरणार आहे.
दरम्यानच्या काळात पाटील यांना थांबविण्यासाठी जिवाचे रान करणाऱ्या भाजपने तांबे यांच्या पाठिंब्याबद्दलही भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे भाजपच्या भूमिकेवरून आता विविध चर्चांना उधाण आले आहे. एकूणच या सर्व राजकीय सारिपाटात एकहाती विजयाचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या सत्यजित तांबे यांच्यासाठी ही निवडणूक साधी-साेपी राहिलेली नाही.
तीन महिन्यांपूर्वी पक्षप्रवेश करताना तुम्ही पक्षात या नक्कीच विचार करू, असा शब्द भाजपतील नेत्यांनी दिला होता. पण ऐनवेळी भाजपने काम करणाऱ्याला संधी देण्याच्या उद्देशाने संधी दिली नसेल. राजकारणात कोणत्याही क्षणी काही घडू शकते. काहीतरी असल्याशिवाय मी सकाळपासून नॉटरिचेबल होणार नाही. शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच त्यांचे आशीर्वाद मला दिले आहेत. राष्ट्रवादी व कॉंग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधला आहे. महिला उमेदवार म्हणून ‘मविआ’तील तिन्ही पक्ष मला भक्कम साथ देतील.
– शुभांगी पाटील, अपक्ष
हेही वाचा :
- क्रेडिट कार्ड व्यवहारांत 27 टक्क्यांची वाढ
- विदेशी पाहुण्यांना खास पुणेरी भरडधान्याची भुरळ
- कोल्हापूर : प्रशासनाच्या चुका जनतेने का निस्तरायच्या?