क्रेडिट कार्ड व्यवहारांत 27 टक्क्यांची वाढ  | पुढारी

क्रेडिट कार्ड व्यवहारांत 27 टक्क्यांची वाढ 

मुंबई; वृत्तसंस्था :  दोन वर्षांच्या कोरोना काळात देशवासीयांनी खिशाला लावलेली कात्री आता बाजूला करीत दाबून ठेवलेल्या इच्छा-अपेक्षांच्या पूर्तततेसाठी सढळ हाताने खर्च करायला सुरुवात केली आहे. बाजारपेठेत जाणवत असलेले चैतन्य बँकांच्या पुस्तकांतही दिसून येत आहे. गेल्या तिमाहीत क्रेडिट कार्डांवरील व्यवहारांत 27 टक्क्यांची, तर वैयक्तिक कर्जाच्या वितरणात 23 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाच्या संकटात सर्वांनीच अनावश्यक खर्चांना फाटा दिला होता. आवश्यक तेवढाच खर्च करण्यावर भर दिला जात होता. ते बाजारपेठेतही दिसत होते. कोरोनाचे सावट दूर झाले आणि नागरिकही आता ‘होऊ दे खर्च,’ अशी भूमिका घेत आहेत. दोन वर्षे टाळलेला खर्च करण्यासाठी ग्राहक बाजारपेठेत उतरल्याने उलाढाल वाढल्याचे चित्र आहे.

एचडीएफसी बँकेने ठेवींचे तिमाही उद्दिष्ट 1 लाख कोटींचे ठेवले होते. दुसर्‍या तिमाहीत ते 60 हजार कोटी रुपयांवरून वाढून 68 हजार कोटींवर गेले; पण तिसर्‍या तिमाहीत ते 67 हजार कोटीपर्यंत ठेपले. याबाबत विश्लेषकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना बँकेचे मुख्य वित्तीय अधिकारी श्रीनिवासन वैद्यनाथन यांनी याची कारणमीमांसा केली. वैद्यनाथन म्हणाले की, ठेवी वाढवण्यासाठी बँकेने आपले वितरण जाळे आणि ग्राहक संख्येत वाढ केली आहे.

नवीन क्रेडिट कार्डांचे प्रमाण वाढले

वैद्यनाथन म्हणाले की, आम्ही 80 हजार कोटी रुपयांच्या ठेवी अपेक्षित केल्या होत्या; पण 67 हजार कोटींच्याच ठेवी आल्या. या तिमाहीत देशात सर्वत्रच ग्राहकांनी खर्च करण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे बँकेच्या क्रेडिट कार्डवरील व्यवहारांमध्येही तब्बल 27 टक्क्यांची वाढ या वर्षात झाली. ते म्हणाले की, या तिमाहीत बँकेने 12 लाख क्रेडिट कार्डे वितरित केली.

Back to top button