पंतप्रधान ग्रामसडक योजना : ग्रामीणमध्ये रस्ते कामासाठी 50 कोटी | पुढारी

पंतप्रधान ग्रामसडक योजना : ग्रामीणमध्ये रस्ते कामासाठी 50 कोटी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ग्रामीण भागात दळणवळण सहज आणि सोपे व्हावे, यासाठी रस्त्यांचा विकास आणि रस्त्यांच्या मजबुतीसाठी केंद्र सरकारच्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत 50 कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या निधीतून सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबक आणि नाशिक या चार तालुक्यांतील 13 महत्त्वाच्या रस्त्यांचा विकास आणि मजबुतीकरण होणार आहे.

शासनाने मंजूर केलेल्या निधीतून होणार्‍या रस्त्यांच्या मजबुतीकरणामुळे ग्रामीण भागातील शेतीमालाच्या वाहतुकीसाठी मोठा आधार होणार आहे. ग्रामीण भागातील खेड्याचा विकास साधायचा असल्यास रस्त्याचा विकास आणि रस्त्यांचे मजबुतीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी खासदार हेमंत गोडसे गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्नरत होते. शासनाने पंतप्रधान ग्रामसडक योजना 2023 अंतर्गत 50 कोटींच्या निधीला मान्यता दिली आहे. त्यामध्ये नाशिक, सिन्नर, इगतपुरी आणि त्र्यंबक या चार तालुक्यांमध्ये रस्त्यांच्या मजबुती करणाचा समावेश आहे. त्र्यंबक तालुक्यातील कोटंबी – हाणपाडा रस्त्याच्या मजबुतीसाठी दोन कोटी 72 लाख, मेडघर किल्ला ते दुगारवाडी रस्त्याच्या कामासाठी चार कोटी 25 लाख, इजिमा 54 ते बोरीपाडा रायते रस्त्याच्या कामासाठी चार कोटी 39 लाख, नाशिक तालुक्यातील जलालपूर – महादेव रस्त्याच्या कामासाठी दोन कोटी 21 लाख, पळसे ते शेवगेदारणा रस्त्याच्या कामासाठी तीन कोटी 73 लाख, जाखोरी ते जोगलटेंभी रस्त्याच्या कामासाठी दोन कोटी 55 लाख, सारूळ ते राजूरबहुला रस्त्याच्या कामासाठी दोन कोटी 51 लाख. सिन्नर तालुक्यातील शास्त्रीनगर ते वडगाव या रस्त्याच्या कामासाठी तीन कोटी 65 लाख, ब्राह्मणवाडी ते वडझिरे या रस्त्याच्या कामासाठी दोन कोटी 84 लाख, गोंदे फाटा ते मुसळगाव – बारागाव पिंपरी रस्त्यासाठी पाच कोटी 65 लाख, तर इगतपुरी तालुक्यातील रामा – 12 ते वाघोबाची वाडी या दरम्यानच्या रस्त्यासाठी तीन कोटी 98 लाख, नांदडतगाव – सांजेगाव ते शिरसाठे या दरम्यानच्या रस्त्याच्या कामासाठी तीन कोटी 61 लाख, टाके घोटी ते ट्रिंगलवाडी या दरम्यानच्या साडेसात किलोमीटर रस्त्यासाठी पाच कोटी 91 लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे.

हेही वाचा:

Back to top button