पाच तासांपेक्षा कमी झोप आरोग्यासाठी धोकादायक | पुढारी

पाच तासांपेक्षा कमी झोप आरोग्यासाठी धोकादायक

लंडन : विविध संशोधनांनुसार, चांगल्या आरोग्यासाठी किमान सात तासांची झोप आवश्यक आहे. अलीकडच्या काळात झालेल्या पीएलओएस मेडिसिन स्टडीमध्ये असे आढळले आहे, की दररोज रात्री सात तासांपेक्षा कमी झोप घेणं एखाद्याच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ब्रिटिश नागरी सेवेतील व्यक्तींवर करण्यात आलेल्या या अभ्यासात असे दिसून आले, की ज्या व्यक्ती पाच तास किंवा त्यापेक्षा कमी वेळ झोपतात त्यांना अनेक आजार होण्याचा धोका जास्त असतो. या तुलनेत, ज्या व्यक्ती नियमित सात तास झोपतात त्यांना विविध आजार होण्याचा धोका 30 टक्क्यांनी कमी असतो.

या संशोधनात असेही आढळले, की वयाच्या पन्नाशीमध्ये कमी झोपेमुळे मृत्यू होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे, आपले वय आणि आणखी काही घटकांच्या आधारावर आपल्यासाठी किती प्रमाणात झोप आवश्यक आहे याची माहिती असणे गरजेचे आहे. एरिक जे. ओल्सन यांच्या मते, चार ते 12 महिने वयोगटातल्या बालकांसाठी दिवसभरात 12 ते 16 तासांची झोप आवश्यक असते. एक ते दोन वर्षांच्या मुलांसाठी 11 ते 14 तास झोप गरजेची असते. तीन ते पाच वर्षे वयोगटातल्या मुलांनी 10 ते 13 तास झोपले पाहिजे. सहा ते बारा वर्षे वयोगटातल्या मुलांनी नऊ ते 12 तास झोप घेणे गरजेचे आहे. 13 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांनी आठ ते 10 तास झोपले पाहिजे. प्रौढ व्यक्तींसाठी सात ते आठ तासांची झोप आवश्यक असते.

Back to top button