इगतपुरी स्फोट : जिंदाल आग प्रकरणी मनपाच्या लॅडरची महत्त्वपूर्ण भूमिका | पुढारी

इगतपुरी स्फोट : जिंदाल आग प्रकरणी मनपाच्या लॅडरची महत्त्वपूर्ण भूमिका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच १ जानेवारीला घोटी येथील जिंदाल कंपनीला मोठी आग लागल्याची दुर्देवी घटना घडली होती. जवळपास एक आठवडाभर ही आग धुमसत होती. आग शमविण्यात महापालिकेच्या अग्निशमन विभागाने महत्त्वाची भूमिका बजावली. परंतु, यामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती मनपाच्या ३२ मीटर उंचीच्या लॅडर या शिडीची.

१ जानेवारी रोजी जिंदाल कंपनीच्या ॲटोमॅटिक प्लांटला सकाळी मोठी आग लागली. या आगीचे रूप भयानक असे होते. त्यामुळे कंपनीला लागलेली आग विझविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. आगीचे स्वरूप पाहता या ठिकाणी ठिकठिकाणांहून अग्निशमनचे बंब मागविण्यात आले. त्यात नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागानेही आपले अग्निबंब आग विझविण्यासाठी पाठविले. त्यात सहा वाॅटर टेंडर अर्थात अग्निबंब वाहने, एक ब्राऊजर आणि ३२ मीटर उंचीची शिडी पाठविण्यात आली. त्याचबरोबर अग्निशमन विभागाचे प्रमुख संजय बैरागी यांच्या नेतृत्वाखाली जवळपास ३५ जवानांनी जीवाची पर्वा न करता आग विझविण्याचे काम फत्ते केले. आग विझविण्यासाठी मनपा अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांनी पाण्याचा वापर केला. त्याचबरोबर कंपनीत मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, कचरा आणि केमिकल यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते. यामुळे फायरमन कर्मचाऱ्यांनी पाण्याबरोबरच फोमचाही वापर केला. यामुळे दोन दिवसांत आग काही प्रमाणात नियंत्रणात आली.

महापालिका आणि घोटी अंतर अधिक असल्याने तसेच आगीचे प्रमाण पाहता बाहेरून अग्निशमन बंब पाणी आणण्यासाठी पाठविणे शक्य नसल्याने कंपनीत उपलब्ध असलेल्या हायड्रंटचा वापर करून तेथूनच थेट पाण्याचे कनेक्शन घेऊन त्याचा वापर करण्यात आला. त्याचबरोबर १ ते ११ जानेवारी असे ११ दिवस महापालिकेचे एक वाहन आणि काही कर्मचारी जिंदाल कंपनीत सुरक्षिततेच्या कारणास्तव ठेवण्यात आले होते. कंपनीकडे स्वत:च्या असलेल्या अग्निशमन बंबावर आगीमुळे स्लॅब कोसळल्याने वाहन खराब झाले होते. यामुळे महापालिकेला त्या ठिकाणी आपले वाहन दीर्घकाळ ठेवावे लागल्याची माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख संजय बैरागी यांनी सांगितले.

साडेपाच लाखांचे बिल..
जिंदाल कंपनीतील आग विझविण्यासाठी मनपाने पुरविलेल्या अग्निशमन बंब, कर्मचारी तसेच लॅडरसाठी पाच लाख ६६ हजार ३६८ इतके बिल आकारण्यात आले असून, हे बिल कंपनीकडे सादर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी १६ हजार ५७६ रुपये इतका खर्च लागला. हा खर्चदेखील संबंधित कंपनीकडून घेतला जाणार आहे.

हेही वाचा:

Back to top button