पुणे : निमगाव सावा येथील खुनी हल्ल्यातील आरोपींना मध्य प्रदेश येथून अटक | पुढारी

पुणे : निमगाव सावा येथील खुनी हल्ल्यातील आरोपींना मध्य प्रदेश येथून अटक

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा :  नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील निमगावसावा येथे पुर्ववैमनस्यातुन व्यावसायिक पिस्तुल तसेच धारदार शस्त्रांनी झालेल्या खुनी हल्ल्यातील सुत्रधार तसेच मारेकरी यांना मध्यप्रदेश येथून ताब्यात घेतले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर व नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. आरोपींना जुन्नर न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. शाहरूख नादिर पटेल (रा. निमगाव सावा, ता. जुन्नर), प्रकाश फिरंग्या पाडवी (वय २२, रा. केली सिलावद, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) व एक अल्पवयीन मुलगा असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत निमगावसावा येथे ४ जानेवारी रोजी रात्री ९ च्या सुमारास व्यावसायिक इक्बाल सरदार पटेल याचेवर कुणीतरी अज्ञात इसमांनी पुर्ववैमनस्यातुन धारदार शस्त्रांनी वार करून पसार झाल्याची घटना घडली होती. या गुन्हयातील अज्ञात आरोपी  हे फरार होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याबाबतच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी पोलीस पथक तयार केले.
आरोपीबाबत तांत्रिक मदतीचा आधार घेऊन संशयीत आरोपी शोध घेणेबाबत सुचना दिल्या. गोपनीय माहितीद्वारे या गुन्हयातील आरोपी हे मध्यप्रदेश येथील असून ते गुन्हा घडलेपासून मध्य प्रदेश राज्यात वावरत आहे तसेच निमगावसावा येथील शाहरूख पटेल याचे सांगण्यावरूनच त्याने गुन्हा केला असावा, अशी माहीती मिळाल्याने शाहरूख यास ताब्यात घेऊन त्याचेकडे चौकशी केली. त्याचेकडून मध्य प्रदेश येथील आरोपींची नावे मिळाली.  आरोपी हे केळी सिलावद या ठिकाणी असल्याची खात्री झाल्याने पथकाने तेथील स्थानिक पोलीस स्टेशनच्या मदतीच्या आधारे स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन एक विधी संघर्षीत बालक ताब्यात घेतले. त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली तसेच त्याने प्रकाश पाडवी याचा गुन्हा करण्यामध्ये सहभाग असल्याचे सांगितले. त्यानुसार त्याला धुळे येथे सापळा लावुन ताब्यात घेतले. त्याचेकडे सदर गुन्ह्याबाबत  अधिक चौकशी केली असता त्याने हा गुन्हा शाहरूख पटेल सोबत केला असल्याची कबुली दिली. गुन्हा करते वेळी वापरलेले धारदार शस्त्र व गावठी कट्टा घटनास्थळापासून जवळच असलेल्या उसाचे शेतातून जप्त केले. आरोपीविरुद्ध नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलिस हवालदार दिपक साबळे, पोलिस नाईक दिनेश साबळे, पोलिस जवान सचिन कोबल, संतोष साळुंके, अक्षय नवले, शैलेश वाघमारे, संदिप वारे, संतोष कोकणे, आकाश खंडे यांचे पथकाने केली आहे.

Back to top button