नाशिकमधील बोगस डॉक्टरांवर प्रशासनाची मेहेरबानी, तक्रारी असूनही… | पुढारी

नाशिकमधील बोगस डॉक्टरांवर प्रशासनाची मेहेरबानी, तक्रारी असूनही...

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांबाबत कारवाई करण्याचे अधिकार आपल्याकडे नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले असले तरी मात्र, याबाबत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना अद्याप एकदाही विचारणा अथवा तक्रारींचा पाठपुरावा केला नसल्याने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचीच बोगस डॉक्टरांवर विशेष मेहेरबानी असल्याचे समोर येत आहे.

जिल्ह्यात बोगस डॉक्टरांबाबत अनेक तक्रारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे आलेल्या आहेत. त्यांनी त्या तालुका अधिकाऱ्यांकडे वर्ग केल्या असल्या तरी तालुकास्तरावरून एकाही तक्रारीचा अहवाल प्राप्त झालेला नाही. हा अहवाल का प्राप्त झाला नाही, याबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने एकदाही विचारणा केलेली नाही. वास्तविक आरोग्य विभागाने वेळेत पत्रव्यवहार करून नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांना कायदा दाखविणे आ‌वश्यक असताना तेच पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या दोन वर्षांत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात बोगस वैद्यकीय प्रॅक्टिस करणाऱ्यांबाबत २३ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये इगतपुरी तालुक्यातील ७, नांदगाव तालुक्यातील ५, मालेगाव तालुक्यातील ३, सिन्नर आणि निफाड २, तर दिंडोरी, बागलाण, नाशिक आणि नाशिक मनपा या ठिकाणाहून प्रत्येकी १ अशा तक्रारी वेळोवेळी आरोग्य विभागाने तालुकास्तरावर पाठवून त्याबाबत काय कारवाई केली, याबाबत अहवाल मागवला होता. मात्र, तालुकास्तरावरून गेल्या दोन वर्षांत एकही अहवाल प्राप्त झाला नाही आणि जिल्हा परिषदेने त्याबाबत संबंधित तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना स्मरणपत्र पाठविण्याचीही तसदी घेतली नसल्याने हे बोगस डॉक्टर सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचे समाेर आले आहे.

बोगस डॉक्टरांच्या तक्रारी निकाली काढण्यासाठी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये तालुका आरोग्य अधिकारी हे सदस्य सचिव, तर जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी हे सदस्य आहेत. ज्या नागरिकांना बोगस डॉक्टरांबाबत संशय येतो त्यांच्यामार्फत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात येते. ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे वर्ग करून त्यांवर काय कारवाई केली याबाबतचा अहवाल मागवला जातो. याबाबत बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचे अधिकार या समितीला देण्यात आलेले आहेत. मात्र, अद्याप याबाबत एकाही बोगस डॉक्टरवर कारवाई झालेली नसल्याने संशय व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा :

Back to top button