बेळगाव : रेशन पुरवठ्यात कपात; केंद्र सरकारकडून तांदूळ बंद | पुढारी

बेळगाव : रेशन पुरवठ्यात कपात; केंद्र सरकारकडून तांदूळ बंद

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत देण्यात येणार्‍या रेशनमध्ये जानेवारी महिन्यात कपात करण्यात आली आहे. लाभार्थ्यांना आता प्रतिव्यक्ती 10 किलोऐवजी 5 किलो तांदूळ वितरित करण्यात येत आहेत. यापुढे आता लाभार्थ्यांना दर महिन्याला 5 किलो तांदूळ दिला जाणार आहे.

सर्वसामान्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून कोरोना काळापासून वाढीव रेशनचा पुरवठा केला जात होता. केंद्राकडून 5 तर राज्य सरकारकडून 5 किलो असा एकूण 10 किलो तांदूळ तांदूळ रेशनदुकानातून दिला जात होता. मात्र, नवीन वर्षात रेशनच्या वितरणात कपात करण्यात आली आहे. आता केंद्र सरकारकडून राज्य सरकारला होणारा धान्याचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना 10 ऐवजी 5 किलो तांदूळ वितरित केला जात आहे. जानेवारी महिन्यात लाभार्थ्यांना प्रत्येकी 5 किलो तर फेब्रुवारी महिन्यात 7 किलो आणि त्यापुढे केवळ 6 किलो तांदूळ वाटप केला जाणार आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून देण्यात आली आहे.
रेशनच्या तांदळाची मोठ्या प्रमाणात काळ्या बाजारात विक्री करण्यात येत होती. 10 ते 12 रुपये किलोप्रमाणे तांदूळ विकला जाता होता. आता रेशनमध्ये कपात करण्यात आल्याने काळ्या बाजाराला आळा बसणार आहे.

10 किलोवरून 6 किलो तांदूळ

2 वर्षांपासून वाढीव धान्याचा पुरवठा केला जात होता. मात्र, आता शासनाने यामध्ये बदल केला आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारला मोफत रेशनचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय 10 किलो तांदळावरून 6 किलो तांदूळ वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुुळे लाभार्थ्यांना आता 6 किलो तांदळावर समाधान मानावे लागणार आहे.

Back to top button