

शांघाई; वृत्तसंस्था : कधी, कोणी कशावरून गोंधळ घालेल, हे काही सांगता येत नाही. याचा प्रत्यय चीनमधील एका शहरात नुकताच आला. लॅपटॉप हरवल्याची चौकशी हॉटेल कर्मचार्यांकडे केली. मात्र, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्याने संतप्त होऊन स्पोर्टस् कार चक्क हॉटेलमध्येच घुसविली.
चीनमधील शांघाई शहरात घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. यासंदर्भातील माहिती अशी की, 28 वर्षीय चेन याचा लॅपटॉप हरवला. त्याने यासंदर्भात हॉटेलमधील कर्मचार्यांकडे चौकशी केली. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. हा वाद वाढतच गेला. यामुळे संताप अनावर झाल्याने चेनने आपली स्पोर्टस् कार वेगाने हॉटेलमध्ये घुसविली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नसले, तरी वित्तहानी मात्र चांगलीच झाली. चेनने सांगितले की, हॉटेलमध्ये असतानाच माझा लॅपटॉप हरवला. यावरून कर्मचार्यांशी वाद झाला; तर हॉटेल कर्मचार्यांनी सांगितले की, खरोखरच लॅपटॉपची चोरी झाली होती.