नाशिक : गद्दारांना घरातून निघणे मुश्किल करु, पाथर्डीत ठाकरे गटाचा विराट मेळावा | पुढारी

नाशिक : गद्दारांना घरातून निघणे मुश्किल करु, पाथर्डीत ठाकरे गटाचा विराट मेळावा

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

शिवसेनेशी गद्दारी करणारा मग तो कुणीही असो त्याला कदापि माफ केले जाणार नाही. त्याला घरातून निघणे मुश्किल करू असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केले.

गद्दार नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी त्यांच्याच प्रभागात मेळावे घेण्याचा धडाका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या निष्ठावंत शिवसैनिकांनी लावला असून त्याचाच एक भाग म्हणून पाथर्डी येथे आयोजित विराट मेळाव्यास संबोधित करतांना घोलप बोलत होते. व्यासपीठावर उपनेते सुनील बागूल, माजी आमदार वसंत गिते, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी नगरसेवक केशव पोरजे, देवानंद बिरारी, सुभाष गायधनी, नाना पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख बालम शिरसाठ, मंदाताई दातीर बाळा दराडे आदी उपस्थित होते.

शिवसेनेच्या जीवावर जे मोठे झाले त्यांनी पक्षाशी गद्दारी करावी याचे आश्चर्य वाटते. खाल्ल्या मिठास जे जागत नाही ते दुसऱ्यांचे काय भले करणार असा सवाल शिवसेना उपनेते सुनील बागुल यांनी आपल्या भाषणात केला. सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांनीही आपल्या भाषणात गद्दारांचा खरपूस समाचार घेतला. या लोकांना आम्ही सुखाने जगू देणार नाही, असेही ते पुढे म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समाजातील सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यांतील गुण हेरून त्यांना मोठे केले. पैकी काही नगरसेवक, आमदार, खासदार आणि मंत्रीसुद्धा झाले. परंतु असे असतांनाही त्यांनी पक्षाशी बेईमानी करावी याचे आश्चर्य वाटते. जे गद्दार निघाले त्यांचा आम्ही आमच्या पद्धतीने समाचार घेऊच परंतु आगामी निवडणुकांत जनताच त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी आपल्या भाषणात सांगितले. युवासेना उपजिल्हाप्रमुख बालम शिरसाठ यांनी आभार मानले.

हेही वाचा :

Back to top button