Jalgaon Accident : अंगाला हळद लागण्यापूर्वीच तरुणाचा, सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या विवाहितेचा अपघातात मृत्यू | पुढारी

Jalgaon Accident : अंगाला हळद लागण्यापूर्वीच तरुणाचा, सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या विवाहितेचा अपघातात मृत्यू

जळगाव : चाळीसगाव तालुक्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. एका घटनेत भावी नवरदेवाचा तर दुसऱ्या घटनेत सहा महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या विवाहितेचा मृत्यू झाला. तर या महिलेचा पती गंभीर जखमी झाला. या दोन्ही घटनांमुळे पातोंडा व जामदा गावावर शोककळा पसरली आहे.

जामदा (ता. चाळीसगाव) येथील मोहन भाईदास सोनवणे (वय २३) हा मेहुणबारे येथून ट्रॅक्टर घेऊन जात असताना त्याचे ट्रॅक्टर ट्रालीसह उलटले. त्यात मोहन हा ट्रॅक्टरखाली दाबला गेल्याने जागीच ठार झाला. मृत मोहन सोनवणे याचा नुकताच साखरपुडा होऊन १० जानेवारीला त्याचा विवाह होणार होता. घरात विवाहाची तयारी सुरू असल्याने आनंदी वातावरण होते. मात्र अंगाला हळद लावण्यापूर्वीच क्रूर काळाने या तरुणाचे प्राण हिरावून नेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दुचाकीच्या अपघातात नवविवाहितेचा मृत्‍यू

दुसऱ्या घटनेत पातोंडा येथील विवाहितेचा मृत्यू झाला आहे. चाळीसगाव- भडगाव रस्त्यावर पातोंडा गावाजवळ वळणावर हा अपघात झाला. पातोंडा येथील उमेश रघुनाथ रोकडे व त्याची पत्नी प्रियंका उमेश रोकडे (वय २२) हे दाम्पत्य नाशिक येथे जाण्यासाठी दुचाकीने निघाले. गावाजवळ वळणावर समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवर मागे बसलेल्या प्रियंका रोकडे या दुचाकीवरून फेकल्या जावून जागीच ठार झाल्या. तर त्यांचे पती उमेश रोकडे हे गंभीर जखमी झाले. याचा सहा महिन्‍यांपुर्वीच विवाह झाला होता.

हेही वाचा :

Back to top button