गोवा : मोबाईल चोरीप्रकरणी बिहारी युवकास अटक | पुढारी

गोवा : मोबाईल चोरीप्रकरणी बिहारी युवकास अटक

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा : पेट्रोल पंपावर मोबाईल चोरी केल्याप्रकरणी साळगाव पोलिसांनी एका बिहारी युवकास अटक करून त्याच्याकडून चोरीचा मोबाईल जप्त केला, तक्रारीनंतर २४ तासात ही कारवाई करण्यात आली.

या चोरीची तक्रार साळगाव येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक फ्रान्सिस अंद्रादे यांनी दिली होती. दिलेल्या तक्रारीनुसार २० डिसेंबर रोजी उत्तर रात्री ३ ते ३.३० च्या दरम्यान एका अज्ञाताने पेट्रोल पंपाच्या कार्यालयाच्या सरकत्या खिडकीचे लॉक तोडून कार्यालयात प्रवेश केला व एक नोकिया मोबाइल असा मिळून ३१ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.

या प्रकरणी साळगाव पोलिसांनी भादंसं ४५७, ३८० कलमाखाली गुन्हा नोंद करून तपास कामात सुरुवात केली. तपास करीत असताना सीसीटीव्ही फुटेज व इतर माहितीच्या आधारे साळगाव पोलिसांनी अन्वर रफिक हुसेन (२६, रा. आरडी, सुकूर मूळ. किसनगंज, बिहार) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीचा मोबाईल हस्तगत केला. पोलिसांनी चोवीस तासात चोरट्याला जेरबंद केले. त्यामुळे पोलिसांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

साळगाव पोलिस स्थानकाचे निरीक्षक मिलिंद भुईंबर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नवनीत गोलतेकर, महिला उपनिरीक्षक नीलम गावस, कॉन्स्टेबल विजय पाळणी, राहुल आंगोलकर, विशांत आयेकर यांनी ही कारवाई केली. संशयित अन्वर यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी दिली.

Back to top button