शिर्डी : खेड्यातील पाणंद रस्त्यांचे रूपडे पालटणार | पुढारी

शिर्डी : खेड्यातील पाणंद रस्त्यांचे रूपडे पालटणार

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा :  शिर्डी लोकसभा मतदार संघातील शेत रस्त्यासाठी मातोश्री ग्रामसमृद्धी योजनेतून 70 कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांच्या माध्यमातून खा. सदाशिव लोखंडे यांच्या प्रयत्नाने मंजूर झाला असल्याची माहिती बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते व राजेंद्र देवकर यांनी दिली. शिर्डी लोकसभा मतदार संघातील शेत पाणंद रस्त्यांची मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली होती. या परिसरात मोठ्या प्रमाणत दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी व शेतीपूरक व्यवसाय असल्यामुळे व त्यांना शेती उत्पादित माल बाजारपेठत विक्री करण्यासाठी ने -आण करण्यासाठी खराब रस्त्यांमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.

पर्यायाने शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसत होता. अनेक शेतकर्‍यांनी याबाबतच्या अडचणी खा. लोखंडे यांच्या कानी घातल्या होत्या. याकडे खा.लोखंडे यांनी मुख्यमंत्री शिंदे व ना. भुमरे यांचे लक्ष वेधले व मतदार संघातील 132 रस्त्यांसाठी 70 कोटींचा निधी मंजूर करून घेतला. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे.

तालुकानिहाय मंजूर झालेला निधी

श्रीरामपूर तालुक्यातील 54 गावे 97.5 कि. मी., नेवासा तालुका 20 गावे 37 कि.मी., राहुरी तालुका 31 गावे 57.5 कि.मी., संगमनेर तालुका 15 गावे 27.5 कि. मी., कोपरगाव तालुका 19 गावे 34 कि. मी., अकोले तालुका 11 गावे 19 कि.मी., राहाता तालुका 20 गावे 38 कि.मी. अशा प्रकारे 170 गावातील 311 किमी शेत पाणंद रस्त्यासाठी 70 कोटीच्या वर निधी उपलब्ध झालेला आहे. याबद्दल शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे.

Back to top button