नाशिकमध्ये नायलॉन मांजा विक्री सुरूच : पोलिसांच्या कारवाईला घाबरेना विक्रेते | पुढारी

नाशिकमध्ये नायलॉन मांजा विक्री सुरूच : पोलिसांच्या कारवाईला घाबरेना विक्रेते

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नायलॉन मांजा विक्री व वापरावर बंदी आहे. तरीदेखील बाजारात मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा उपलब्ध असून, त्याचा वापरही होत आहे. पोलिसांकडून नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे. मात्र, तरीदेखील विक्री सुरूच असल्याने पोलिसांच्या कारवाईलाही विक्रेते घाबरत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नायलॉन मांजा विक्री करणार्‍या मोठ्या विक्रेत्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

शहर पोलिसांतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई होत आहे. मात्र छोट्या विक्रेत्यांवर कारवाई करून पोलिसांकडून मांजाचा किरकोळ साठा जप्त केला जात आहे. या छोट्या विक्रेत्यांना नायलॉन मांजाचा साठा पुरवणार्‍यांवरच कारवाई करण्याची मागणी होत आहे. सातपूर येथे एकाचा नायलॉन मांजामुळे गळा चिरला तर गौरी पटांगणावर वृद्ध व्यक्तीच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. त्याचप्रमाणे नायलॉन मांजामुळे अनेक पक्ष्यांना जीव गमवावे लागले आहेत. त्यामुळे नायलॉन मांजा विक्री व वापरावर बंदी आहे. तरीदेखील विक्रेते चोरीछुप्या पद्धतीने मांजा विक्री करत असून, पतंगप्रेमीही मांजाचा वापर करीत आहेत. त्यामुळे शहर पोलिसांनी 24 डिसेंबर ते 23 जानेवारी दरम्यान नायलॉन मांजाच्या विक्री, वापरावर व साठा करण्यावर बंदी घातली आहे. तरीदेखील मांजा विक्री व वापर सुरू आहे. पोलिसांकडून गेल्या काही दिवसांपासून मांजा विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे. यात विक्रेत्यांकडून सुमारे चार लाखांहून अधिकचा मांजासाठा जप्त केला आहे. मात्र, ही कारवाई छोट्या विक्रेत्यांवरच होत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे मोठे विक्रेते अजूनही नायलॉन मांजाचा साठा करून विक्री करीत असल्याची चर्चा आहे.

गुन्हा दाखल…
सरकारवाडा पोलिसांनी दहीपूल येथे कारवाई करीत एक लाख सात हजार 800 रुपयांचा नायलॉन मांजाचा साठा जप्त केला आहे. संशयित जॅकी सुरेश चंदनानी (30, रा. टिळकवाडी), मनीष प्रकाश लेडवाणी (33, रा. गोविंदनगर) हे नायलॉन मांजा विक्री करत असताना पोलिसांनी पकडले. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

Back to top button