

नगर : पुढारी वृत्तसेवा : शहरात चायना माजाची विक्री करणार्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा. दुकान मालकांचे परवाने रद्द करा, असे आदेश आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी अधिकार्यांना दिले. संक्रातीचा सणजवळ आल्याने शहरात चायना माजाची सर्रास विक्री होत असल्याच्या तक्रारी आयुक्तांकडे आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी विविध विभागांसह घनकचरा विभागाची बैठक घेतली. यावेळी घनकचरा विभागप्रमुख डॉ. शंकर शेडाळे, ढवळे आदींसह स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.
याप्रसंगी आयुक्त डॉ. जावळे यांनी प्लॉस्टिक बंदीची मोहीम अधिक तीव्र करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, कचरा संकलन करणारी वाहने प्रत्येक प्रभागात जातात की नाही याचा आढावा घेतला. ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्यासंदर्भाता माहिती घेतली. कचरा संकलन करणार्या वाहनामध्ये दोन भाग करण्यात आले असून, त्यात ओला व सुका कचर्याचे संकलन करण्यात असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
शहरात अनेक दुकानदार चायना माजा विक्री करीत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. चायना माजा शोध मोहिमेसाठी स्वतंत्र पथक नेमण्यात येणार आहे. दुकानात चायना माजा आढळून आल्यास फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा, अशा सूचना दिल्या. शहरात काही भागात नागरिकांकडे अद्यापि शौचालय नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यावर तत्काळ सर्व्हेक्षण करून यादी तयार करा. संबंधित कुटुंबाला शौचालयासाठी बांधून देण्याचा निर्णय बैठकीत झाला. प्लॉस्टिक बंदीची मोहीम तीव्र करण्याच्या सूचना अधिकार्यांना देण्यात आल्या.