धुळे : पुढारी वृत्तसेवा
धुळे तालुक्यासह जिल्हयात जून ते ऑक्टोंबर 2022 या कालावधित अतिवृष्टी, अवकाळीमुळे बाधित झालेल्या नुकसानग्रस्त शेतकर्यांना अद्याप कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही. या कालावधीत जिल्हयासाठी एकूण 54 कोटी 63 लक्ष व धुळे तालुक्यासाठी 51 कोटी 45 लक्ष रुपये एवढ्या मदत निधीची भरपाई म्हणून मागणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप कोणतीही मदत शेतकर्यांना मिळाली नसल्याने धुळे जिल्हयातील शेतकर्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. म्हणून धुळे तालुका आणि जिल्हयातील बाधित शेतकर्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याबाबत शासनाने योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी आ. कुणाल पाटील यांनी आज विधानसभेत केली.
नागपूरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात आज आ. कुणाल पाटील यांनी लक्षवेधी नुसार विधानसभेत सुरु झालेल्या अधिवेशनात धुळे तालुक्यातील व जिल्हयातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या नुकसान भरपाईचा प्रश्नावर आवाज उठविला. आ. कुणाल पाटील यांनी सांगितले की, धुळे जिल्हयासह धुळे तालुक्यात गेल्या दोन वर्षापासून अतिवृष्टी, अवकाळी पावसाने शेतकर्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होवून कर्जबाजारी झाला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्यांना अद्याप शासनाकडून कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही. परिणामी सर्वत्र असंतोषाचे वातावरण आहे. आपल्या भाषणात आ.कुणाल पाटील यांनी पुढे आकडेवारीसह नुकसानीची विगतवारी सादर करतांना सांगितले कि, धुळे तालुक्यात 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2022 या कालावधीत 770 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. तसेच दि. 18 व 19 सप्टेंबर 2022 रोजी 36 हजार 500 हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. नुकसानीचा शासनास अहवाल पाठविला असतांना अद्याप कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही.
दरम्यान ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 मध्ये धुळे तालुक्यातील शेतकर्यांच्या शेतीचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईपासूनही शेतकरी अद्याप वंचित आहेत. त्यासाठी एकूण 8 कोटी 47 लक्ष 57 हजार रुपये अनुदान देण्याची आवश्यकता आहे. म्हणून अतिवृष्टी आणि अवकाळीमध्ये शेतीपिकांचे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी आ. कुणाल पाटील यांनी विधानभवनात केली. आ. कुणाल पाटील यांनी शेतकर्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आवाज उठविल्याने जिल्हयातील शेतकर्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.