

Stock Market Updates : कमकुवत जागतिक संकेतांमुळे आज भारतीय शेअर बाजारात चढ-उतार दिसून आला. अमेरिका, आशियाई बाजारात घसरण झाली. या कमकुवत जागतिक संकेतांमुळे बुधवारी (दि.२८) सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण पहायला मिळाली. सेन्सेक्स सुमारे १४० हून अंकांनी घसरून ६०,८०० वर तर निफ्टी १८ हजारांवर खुला झाला होता. त्यानंतर दोन्ही निर्देशांक घसरणीतून सावरत स्थिर पातळीवर आले. त्यानंतर सेन्सेक्स १७ अंकांच्या किरकोळ घसरणीसह ६०,९१० वर बंद झाला. तर निफ्टी १८,१२२ वर स्थिरावला.
अमेरिकेतून मिळालेल्या संकेतांमुळे बुधवारी भारतीय शेअर बाजारातील दोन्ही निर्देशांक घसरणीसह खुले झाले होते. त्यानंतर ते स्थिर पातळीवर आले. तीन आठवड्यांच्या उच्चांकाच्या जवळ पोहोचलेल्या तेलाच्या किमती तसेच चीनमध्ये COVID-19 रुग्णसंख्येत झालेली वाढ आदी घटक शेअर बाजारातील व्यवहारांवर परिणाम करणारे ठरले. बहुतेक प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकांत घसरण झाली. माहिती तंत्रज्ञान स्टॉक्स सुमारे १ टक्क्याने खाली आले.
आज व्यवहारात दिग्गज शेअर्समध्ये चौफेर खरेदी पहायला मिळाली. सर्वाधिक दबाव आयटी शेअर्समध्ये होता. निफ्टीवर आयटी इंडेक्स सुमारे ०.८ टक्क्यांनी कमजोर दिसून आला. बँक, वित्त आणि ऑटो इंडेक्स कमजोर झाले. फार्मा इंडेक्स स्थिर होता. मेटल, रियल्टी आणि एफएमसीजी इंडेक्सनेदेखील लाल रंगात व्यवहार केला. टायटन कंपनी, एम अँड एम, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, मारुती सुझुकी आणि यूपीएल हे निफ्टीवरील टॉप गेनर्स होते. तर, भारती एअरटेल, अपोलो हॉस्पिटल्स, हिंदाल्को इंडस्ट्रीज, टाटा स्टील आणि बजाज फिनसर्व्ह यांचा लूसर्जमध्ये समावेश होता.
डॉलर मजबूत राहिला आहे. तर आशियाई शेअर बाजारात घसरण पहायला मिळत आहे. कोरोना निर्बंधातून बाहेर पडून चीनची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येईल याकडे आशियातील गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. यामुळे गुंतवणूदारांनी सावध भूमिका घेतली आहे. याचा परिणाम आशियाई शेअर्सवर दिसून आला. बुधवारी टोकियोचे शेअर्स खाली येऊन बंद झाले. निक्केई 225 निर्देशांक ०.४१ टक्के म्हणजेच १०७ अंकांनी घसरून २६,३४० वर बंद झाला. तर टॉपिक्स निर्देशांक ०.०६ टक्के म्हणजेच १.१३ अंकांनी घसरून १,९०९ वर आला.
दरम्यान, रात्रभर अमेरिकेतील दोन निर्देशांक नॅस्डॅक कंपोझिट आणि S&P ५०० घसरणीसह बंद झाले. या निर्देशांकात अनुक्रमे १.३८ टक्क्यांनी आणि ०.४ टक्क्यांनी घसरण झाली. तर डाऊ जोन्समध्ये किरकोळ वाढ दिसून आली. अमेरिकेतील बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर आशियाई बाजारात नकारात्मक वातावरण राहिले. चीनच्या शांघाय कंपोझिट आणि शेन्झेन निर्देशांकात घसरण दिसून आली. दक्षिण कोरियाचा KOSPI निर्देशांक १.९७ टक्क्यांनी खाली आला. (Share Market Today)
ख्रिसमसच्या सुट्टीनंतर लंडनमधील कामकाज सुरु झाले. यामुळे बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात युरोपीय शेअर बाजारात तेजी होती. ब्रिटनची राजधानी लंडन येथील FTSE 100 निर्देशांक ०.८ टक्क्यांनी वाढून ७,५३१ अंकांवर पोहोचला. फ्रँकफर्टचा DAX निर्देशांक ०.१ टक्क्यांनी वधारून १४,००६ अंकांवर पोहोचला. तर फ्रान्स शेअर बाजारातील पॅरिस CAC 40 निर्देशांकाने ०.२ टक्क्यांची वाढ नोंदवून ६,५६२ वर मजल मारली. (Stock Market Updates)
हे ही वाचा :