जळगाव : पुढारी वृत्तसेवा
मधुकर सहकारी साखर कारखाना विक्री करण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे. यानंतर ठरल्याप्रमाणे कारखान्याची विक्री देखील झाली. मात्र थकीत वेतन मिळण्यासह कारखाना विक्री प्रकरणातील संशयकल्लोळ दुर करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. यावेळी आंदोलकांनी जिल्हा बँक अध्यक्ष गुलाबराव देवकर यांची गाडी कारखान्याच्या गेटवर अडवून आपला रोष व्यक्त केला.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत कर्जापोटी बँक सिक्युरटायझेशन नियमाच्या अंतर्गत मधुकर सहकारी साखर कारखान्याची विक्री केली असून खासगी मालकाने याचा गाळप हंगाम सुरू केला आहे. नवीन मालकांनी कर्मचार्यांची थकीत देणी देण्यास नकार दिल्याने कर्मचार्यांनी दोन दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, आज जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर हे आंदोलनस्थळी भेट देणार असल्याची माहिती समोर आली होती. या आधीच कर्मचार्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. देवकर यांची गाडी कारखाना गेटजवळ येताच कर्मचाऱ्यांनी गाडी अडवून आपल्या मागण्या लावून धरल्या.
मसाकाच्या कर्मचार्यांनी आज सकाळपासून अंकलेश्वर-बर्हाणपूर महामार्ग रोखून धरत आपला रोष व्यक्त केला. याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. तर रास्ता रोको आंदोलनामुळे दोन्ही बाजूंनी वाहतुकीची कोंडी झाल्याचे दिसून येत आहे. या आंदोलनात खासदार रक्षा खडसे, अमोल हरीभाऊ जावळे, शरद महाजन आदींसह परिसरातील लोकप्रतिनिधींनी देखील भाग घेतला आहे.