नाशिकमध्ये ठाकरे गटाची पडझड सुरुच, माजी आमदारासह नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात | पुढारी

नाशिकमध्ये ठाकरे गटाची पडझड सुरुच, माजी आमदारासह नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गेल्या आठवड्यात शहरातील १३ नगरसेवक, मनमाडच्या माजी नगराध्यक्ष अस्मा तांबोळी, सादिक तांबोळी आणि दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मंगळवारी (दि.२७) शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांच्यासह माजी नगराध्यक्ष, माजी जि. प. सदस्य, माजी नगरसेवक यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या शिवसेनेची पडझड सुरूच आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नाशिक शहरातील १३ नगरसेवकांमध्ये अजय बोरस्ते यांच्यासारख्या मातब्बर नगरसेवकांचा सहभाग होता. त्यानंतर मनमाडचे माजी नगराध्यक्ष अस्मा तांबोळी, सादिक तांबोळी हे समर्थकांसह शिंदे गटात दाखल झाले होते. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांचा राइट हॅंड समजल्या जाणाऱ्या भाऊसाहेब चौधरी यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. शिंदे गटाने त्यांची नियुक्ती सचिवपदी केली. त्यानंतर मंगळवारी (दि.२७) दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार धनराज महाले, माजी जि. प. सदस्य सुरेश डोखळे यांच्यासह महापालिकेचे माजी नगरसेवक आणि अन्य पदाधिकारी शिंदे गटात दाखल झाले आहेत. महापालिकेच्या माजी नगरसेवकांमध्ये मंदाकिनी जाधव, हरिष भडांगे, मेघा साळवे, मनसे विभागप्रमुख नितीन साळवे आणि छत्रपती युवा सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेते शिंदे गटात दाखल होत असल्याने जिल्ह्याच्या राजकारणात वेगळेच वारे वाहत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा :

Back to top button