

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : आर्थिक वादातून मावस भावाच्या मुलाचे अपहरण करून रंकाळा तलावाजवळील खणीत ढकलून देऊन अमानुष खून केल्याप्रकरणी विश्वास बंडा लोहार (वय 30, रा. तिसंगी पैकी मुसलमानवाडी, ता. गगनबावडा) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश (3) एस. एस. तांबे यांनी मंगळवारी जन्मठेप व 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. 5 नोव्हेंबर 2017 रोजी माथेफिरूने प्रदीप सरदार सुतार या 9 वर्षाच्या बालकाचा बळी घेतला होता.
लोहारला भा.दं.वि 302 अन्वये जन्मठेप, 5 हजाराचा दंड, 363 अन्वये 7 वर्षे व 5 हजाराचा दंड तसेच 364 नुसार 10 वर्षे सक्तमजुरी, 5 हजाराचा दंड ठोठावण्यात आला. तीनही शिक्षा एकाचवेळी भोगायच्या आहेत. करवीर, पन्हाळा व गगनबावडा तालुक्यात गाजलेल्या खून खटल्यात सरकार पक्षामार्फत सरकारी अभियोक्ता अॅड. मंजुषा पाटील यांनी काम पाहिले.
खटल्याची पार्श्वभूमी अशी की, फिर्यादी सरदार तुकाराम सुतार (रा. मरळी, ता. पन्हाळा) व आरोपी विश्वास लोहार हे नात्याने मावस भाऊ आहेत. घराच्या बांधकामासाठी लोहारने सरदार सुतारकडून 40 हजार रुपये हातउसने घेतले होते. वारंवार मागणी करूनही लोहारने पैसे परत दिले नव्हते. या कारणातून त्यांच्यात वादावादीही झाली होती.
सुतार यांच्या भावाचा अपघात झाल्याने दवाखान्याच्या बिलासाठी त्यांनी लोहारकडे पैशाची मागणी केली. त्यामुळे चिडलेल्या लोहारने 'सारखे पैसे मागताय, बघतो मी काय करायचे ते…' अशी धमकी दिली. 5 नोव्हेंबर 2017 रोजी लोहार पुन्हा सुतार यांच्या घरी आला. यावेळी घरात मुलगा प्रदीप, आजी व आई उपस्थित होती. लोहारने रंकाळ्यावर फिरायला जाण्याच्या बहाण्याने प्रदीपला आपल्यासोबत सोडण्याची कुटुंबीयांना विनंती केली. त्यानंतर आईच्या परवानगीने प्रदीप हा लोहारसह बाहेर पडला. पण सायंकाळपर्यंत मुलगा घराकडे न परतल्याने वडीलांनी चौकशी केली. लोहारशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्याने प्रतिसाद दिला नाही. काही वेळाने संपर्क झाल्यावर प्रदीप आला नसल्याचे सांगून टाळाटाळ केली.
गोंधळलेल्या स्थितीत सुतार ग्रामस्थांसमवेत कोल्हापुरात आले. त्यावेळी लोहार रंकाळा स्टँडवर आढळून आला. लोहारने मुलाचा घातपात केला असावा, या संशयाने वडिलांनी लोहारला जुना राजवाडा पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनीही त्याच्याकडे चौकशी केली. शोध घेत असता दुसर्या दिवशी प्रदीपचा मृतदेह रंकाळा तलावाजवळील खणीत आढळून आला होता. चौकशीअंती लोहारने मुलाला खणीत ढकलून देऊन खून केल्याचे निष्पन्न झाले होते.
याप्रकरणी कळे पोलिस ठाण्यात विश्वास लोहारविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलिस अधिकारी मंगेश देसाई यांनी आरोपीविरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश (3) तांबे यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली. खटल्यात 22 जणांच्या महत्त्वपूर्ण साक्षी झाल्या. सरकारी अभियोक्ता मंजुषा पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने नराधमाला जन्मठेप व 15 हजार रु.चा दंड ठोठावला.