सांगली : शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावा

सांगली : शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावा

सांगली; पुढारी वृत्तसेवा : प्राथमिक शिक्षकांचे वेतन व वेतनेतर अनुदान शासनाकडून वेळेत मिळत नाही, यासह प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नाबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने आमदार रोहित पवार यांच्याकडे साकडे घातले आहे. या प्रश्नांबाबत पाठपुरावा करून शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

आ. पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांच्या वेतनासाठी, इतर प्रलंबित देयकांसाठी शासनाकडून वेळेत पुरेसे अनुदान मिळत नाही. त्याबाबत संबंधित विभागाकडे पाठपुरावा व्हावा. प्राथमिक शिक्षकांना ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी द्यावे, असा शासन आदेश आहे. मात्र मिरज तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचा पगार शासनाकडून वेतनासाठीचे अनुदान 22 कोटी रुपयांनी कमी आल्यामुळे वेळेत झाला नाही. नोव्हेंबरच्या वेतनासाठी जिल्ह्याला सात कोटी रुपयांचा निधी कमी प्राप्त झाला आहे. त्यामुळे तासगाव तालुक्यातील चिंचणी केंद्रातील प्राथमिक शाळांचे वेतन होऊ शकले नाही. त्यामुळे शिक्षकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचे हप्ते भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करण्यासाठी शासनाकडून अनुदान प्राप्त झाले नाही. सेवानिवृत्त शिक्षकांना सेवानिवृत्तीनंतर वर्ष होऊनही सेवा उपदान रक्कम अपुर्‍या अनुदानामुळे मिळाली नाही. वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकांना मार्चपासून निधी प्राप्त झाला नाही. निवेदनावर शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, अविनाश गुरव, दगडू येवले, अरुण पाटील, हंबीरराव पवार, तानाजी खोत यांच्या सह्या आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news