नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक लोकसभा मतदारसंघात मंजूर झालेल्या सुमारे १३ कोटी रूपयांच्या रस्ते विकास कामांवरून भाजप आणि शिंदे गट या राज्यात सत्तेवर असलेल्या आमदार-खासदारांमध्ये श्रेयवाद रंगला आहे. याआधीही विकास कामांच्या निधीप्रश्नी खासदार हेमंत गोडसे आणि आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्यात वाद निर्माण झाला होता.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंदाजपत्रकातून सुमारे १३ कोटींची कामे मंजूर झाल्याचा अभिप्राय असताना संबंधित कामे आपणच मंजूर केल्याचा खासदार गोडसेंचा दावा भाजप आमदार ढिकले यांनी खोडून काढला आहे. तर दुसरीकडे खासदार गोडसे यांनी मी देखील संबंधित कामांसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणावरून राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप आणि शिंदे गटामधील लोकप्रतिनिधींमध्ये मात्र समन्वय नसल्याचे पहावयास मिळत आहे. सिडकोमधील घरे फ्री होल्ड करणे, गोदावरी नदीवरील वादग्रस्त पुलाची शिफारस करणे, मखमलाबाद येथील रस्त्यांची कामे अशा अनेक कामांमधून शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे आणि भाजप आमदारांमध्ये बिनसल्याचे याआधी समोर आले आहे. आता त्यात नाशिक लोकसभा मतदारसंघातील १२.७५ कोटींची रस्ते विकासकामांची भर पडली आहे. संबंधित कामे विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर झाली असून, संबंधित कामे आपल्याच प्रयत्नातून मंजूर झाल्याचा दावा गोडसे यांनी केला आहे. त्यावर आमदार ढिकले यांनी आक्षेप घेत रस्ते विकासाची कामे आपल्या पाठपुराव्यामुळे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मंत्रालयात पाठवलेल्या बजेट प्लेटमध्ये माझ्या नावानिशी मंजूर झाल्याचा दावा केला आहे.
दरम्यान आता शहराशी तसेच मतदार संघांमधील विकासकामांच्या श्रेयाचा मुद्दा दोन्ही बाजुंकडून राज्य शासनाकडे वरिष्ठांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यावर आता संबंधित पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात आणि कशी समजूत घालतात, याकडे लक्ष लागून आहे. महापालिकेची आगामी निवडणूक आणि दीड-दोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वाद निर्माण होऊ लागले आहेत.
मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा करून संबंधित कामे मंजूर करून आणली आहे. बांधकाम विभागाने बजेट प्लेट माझ्या नावानिशी ही कामे मंजूर केली आहे. असे असताना त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न खासदार गोडसेंकडून होणे दुदैवी आहे.
– ॲड. राहुल ढिकले, आमदार, भाजप
संबंधित कामांच्या मंजुरीसाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत आहे. आमदार ढिकले यांनीही त्याकरता प्रयत्न केले असतील तर त्यांनीदेखील या कामांचे श्रेय घ्यावे त्यास आपला विरोध नाही.
– हेमंत गोडसे, खासदार,