पुणे : पुनीत बालन यांच्याकडून नवीन चित्रपटाची घोषणा | पुढारी

पुणे : पुनीत बालन यांच्याकडून नवीन चित्रपटाची घोषणा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : चित्रपट निर्माते आणि युवा उद्योजक पुनीत बालन यांनी सोशल मीडियावर क्लॅपचा फोटो शेअर करीत आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘रानटी’असे या चित्रपटाचे नाव असून, समित कक्कड हे त्याचे दिग्दर्शन करत आहेत.
‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर पुनीत बालन स्टुडिओजच्या माध्यमातून बालन यांनी केलेल्या गुड शॉट, द हिंदू बॉय या प्रामुख्याने काश्मीरमधील वास्तव्यावर बोट ठेवण्यार्‍या शॉर्ट फिल्मला जोरदार प्रतिसाद मिळाला.

तसेच आशेची रोषणाई, पुनरागमनायच या शॉर्ट फिल्म आणि प्रामुख्याने काश्मिरी कलावंतांचा सहभाग असलेल्या ‘अमन का आशियाना’ या अल्बमलासुद्धा प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यांचा ‘जग्गु आणि ज्युलिएट’ हा मराठी चित्रपट नवीन वर्षात रिलीज होणार आहे. या सर्व चित्रपट आणि शॉर्ट फिल्मच्या मालिकेत आता पुनीत बालन यांनी ’रानटी’ नवा चित्रपट हाती घेतला आहे.

‘रानटी’ या टायटलसोबत दिलेली ’काही असतात, काही बनतात’ ही टॅग लाइन रसिकांची उत्सुकता वाढवणारी आहे. बालन यांनी ‘रानटी’चा क्लॅप बोर्ड शेअर केला असला, तरी यात नक्की ‘रानटी’ कोण बनलं आहे हे सध्या तरी गुलदस्त्यातच ठेवण्यात आलं आहे. लवकरच त्यावरूनही पडदा उठेल. पण, तोपर्यंत तरी रसिक प्रेक्षकांची उत्सुकता ताणली जाणार आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत असलेल्या समित कक्कड यांनी मराठी सोबतच हिंदीतही दर्जेदार चित्रपट आणि वेब सिरीज बनविल्या आहेत. धारावी बँकनंतर आता कक्कड यांनीही ‘रानटी’चा क्लॅप बोर्ड शेअर करीत आगामी चित्रपटाची दिशा स्पष्ट केली आहे. या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी एस. श्रीराम करत आहेत.

Back to top button