नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील बारा ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक चुरशीची बघायला मिळाली. काही ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे व शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या समर्थकांमध्ये समोरासमोर लढती झाल्या.
थेट सरपंचांसह सदस्यपदाच्या रंगतदार लढतींमध्ये बारापैकी सहा ग्रामपंचायतींमध्ये वाजे गटाची सरशी झाली तर तीन ग्रामपंचायतींमध्ये कोकाटे गटाला वर्चस्व मिळविता आले. एका ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीला यश मिळाले. उर्वरित दोन ग्रामपंचायतींच्या नवनिर्वाचित सरपंचांनी आम्ही स्थानिक पातळीवर जुळवाजुळव केलेली असल्याने गटतट नसल्याचे स्पष्ट केले.
नांदूरशिंगोटे, ठाणगाव, वडगाव पिंगळा, डुबेरेवाडी (कृष्णनगर), सायाळे, कारवाडी या ग्रामपंचायतींवर वाजे गटाने झेंडा फडकावला. त्यात ठाणगाव, वडगाव पिंगळा, सायाळे व कारवाडी येथे परिवर्तनाची लाट दिसून आली. कोकाटे गटाला शहा, पाटपिंप्री, उज्जनी या तीन ग्रामपंचायतींवर निर्भेळ यश मिळाले. मात्र ठाणगाव, वडगाव पिंगळा, सायाळे व कारवाडी या ग्रामपंचायती कोकाटे समर्थकांच्या हातून निसटल्या. कीर्तांगळी ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली. लोणारवाडी (शास्त्रीनगर) व टेंभुरवाडी (आशापूर) या ग्रामपंचायतींनी गटतट नसल्याने स्पष्ट केले आहे.
ठाणगाव- नामदेव शिवाजी शिंदे, नांदूरशिंगोटे- शोभा दीपक बर्के, वडगावपिंगळा- शेवंताबाई गेणू मुठाळ, शहा- संभाजी सोपान जाधव, लोणारवाडी (शास्त्रीनगर)- जरश्री सदाशिव लोणारे, डुबेरेवाडी (कृष्णनगर)- दत्तू म्हातारबा र्गोेंणे, उजनी- निवृत्ती लहानू सापनर, पाटपिंप्री- नंदा रमेश गारकवाड, पाटपिंप्री- नंदा रमेश गारकवाड, साराळे- विकास अण्णासाहेब शेंडगे, आशापूर- सुलोचना सीताराम पाटोळे, कारवाडी- रुपाली नीलेश जाधव, कीर्तांगळी- कुसूम शांताराम चव्हाणके.