शताब्दी एक्स्प्रेसवर अज्ञाताची दगडफेक; भिगवण ते दौंड स्थानकादरम्यानचा प्रकार | पुढारी

शताब्दी एक्स्प्रेसवर अज्ञाताची दगडफेक; भिगवण ते दौंड स्थानकादरम्यानचा प्रकार

दौंड; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर-दौंड रेल्वे मार्गावर रविवारी (दि. 18) रात्री साडेदहाच्या सुमारास हैदराबाद-मुंबई शताब्दी एक्स्प्रेसवर अज्ञातांने दगडफेक केली. या घटनेत वातानुकूलित बोगीतील खिडकीची काच फुटली. परंतु, सुदैवाने कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. याबाबत रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हैदराबाद-मुंबई शताब्दी एक्स्प्रेस सोलापूर-दौंड या रेल्वे मार्गावरून दौंडजवळ आली असताना एका व्यक्तीने गाडीवर दगड फेकला.

त्यामुळे वातानुकूलित बोगीच्या खिडकीची काच फुटली. सुदैवाने त्या बोगीत प्रवास करणार्‍या महिला प्रवासी चंद्रकला (पूर्ण नाव नाही) बचावल्या. पुणे येथे गाडी पोहोचल्यावर या प्रवाशांनी रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येऊन तो तपासाकरिता दौंड रेल्वे सुरक्षा बल यांच्याकडे वर्ग करण्यात आला.

याबाबत रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस निरीक्षक सोलंकी यांनी सांगितले की, संबंधित प्रकार हा दौंड ते भिगवणच्या दरम्यान घडला. वरिष्ठ अधिकार्‍यांनी या घटनास्थळाला भेट दिली. याबाबतचा तपास सुरू आहे.

तीन दिवसातील घटना
दोन दिवसांपूर्वीच मलठणजवळ काकीनाडा एक्स्प्रेसमधील प्रवाशांना मारहाण करून लुटण्यात आले होते. त्यानंतर एका दिवसानेच हा प्रकार घडला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सतत होणार्‍या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Back to top button